दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे मणिपूर धुमसते आहे. इथल्या नागरिकांची परिस्थिती गंभीर आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरकरांची भेट घेण्यासाठी, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेलेले नाहीत. मणिपूरची जनता तुमची भेट घेण्यास आतूर आहे. पंतप्रधानांनी भेट दिल्यास, लोकांशी संवाद साधल्यास पुन्हा शांती प्रस्थापित होण्यास मदत होईल. त्यामुळे आमंत्रण स्वीकारा, असे आवाहन इंडिया आघाडीच्या मणिपूरमधील काँग्रेससह 10 राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केले आहे.
मणिपूरमधील इंडिया ब्लॉक मणिपूरने हे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. पत्रातून ईशान्येकडील राज्यातील अत्यंत गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे, ‘‘संघर्षामुळे संपूर्ण राज्य उद्ध्वस्त झाले आहे आणि सुमारे एक लाखाहून अधिक लोक राज्यात विविध ठिकाणी विस्थापित झाले आहेत आणि शेकडोंनी प्राण गमावले आहेत. आम्ही मणिपूरच्या लोकांच्या वतीने आणि इंडिया ब्लॉक मणिपूरच्या वतीने तुम्हाला आमंत्रित करत आहोत. आमचे राज्य 3 मे 2023पासून म्हणजेच सुमारे 2 वर्षांपासून संघर्षाने वेढलेले आहे, अशांततेत आहे. तेव्हा मणिपूरला तुम्ही भेट द्यावी म्हणून आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.’’
…नाहीतर आम्ही दिल्लीत तुम्हाला भेटायला येतो!
सततच्या हिंसाचारामुळे मणिपूरच्या लोकांमध्ये वेदना, आघात, भीतीचे वातावरण आहे. संघर्ष, अशांतता आणखी वाढली आहे. मणिपूरमध्ये शांतता आणि पूर्व स्थिती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक उपाय योजा. पंतप्रधान मोदींनी 2024 वर्ष संपण्यापूर्वी मणिपूरला भेट द्यावी. मात्र पंतप्रधानांना मणिपूरला येण्यास वेळ नसल्यास इथल्या सर्व राजकीय पक्षांना दिल्लीत तुमच्या अधिकृत निवासस्थानी आमंत्रित करावे. आम्ही दिल्लीत तुमची भेट घेतो, असेही इंडिया ब्लॉकने पत्रात म्हटले आहे.