प्रचारात गुंतलेल्या महायुतीच्या सत्ताधाऱ्यांमुळे जनतेचा जीव धोक्यात; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली असतानाच योग्य आरोग्य व्यवस्थेअभावी जनतेचा जीव धोक्यात आहे. आरोग्य व्यवस्थेच्या या स्थितीला प्रचारात गुंतलेले महायुतीचे सत्ताधारी आणि भ्रष्टाचारात मुरलेली प्रशासकीय व्यवस्था जबाबदार असल्याचा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला.

याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये वडेट्टीवार यांनी राज्यातील बिघडलेल्या आरोग्यव्यवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. गडचिरोलीच्या श्रावणबाळाने वडिलांसाठी खाटेची कावड करून पुरामधून 18 किमी पायपीट केल्याची ही घटना पुढे आली आहे. एक आठवड्यापूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी गडचिरोली जिल्ह्यात लाखो रुपयांचा शासकीय निधी उधळून उद्घाटनाच्या नावाखाली थाटामाटात स्वतःचा प्रचार करून घेतला. मात्र, आता या जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्यव्यवस्था जनतेसमोर आली आहे.

रुग्णवाहिका नसल्यामुळे 14 वर्षाच्या मुलाचा झालेला मृत्यू, जेसीबीमध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्याची घटना, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे नुकतेच 2 वर्षाच्या बाळाचा झालेला मृत्यू… अशा घटना घडत असतानाही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी गडचिरोली दौऱ्यावर असताना आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला नाही. कोणत्याही उपाययोजना करण्याचे निर्देश दिले नाही. त्यांनी फक्त स्वतःचा प्रचार करून घेतला. सत्तेत बसून स्वतःच्या प्रचारात गुंतलेले महायुतीचे सत्ताधारी आणि भ्रष्टाचारात मुरलेली बेजबाबदार प्रशासकीय व्यवस्थेमुळे आज पुन्हा अश्या एका घटनेला सामोरे जावे लागले आहे, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.