पेणमधील नदीकिनाऱ्यावर बॅगेत सापडला महिलेचा मृतदेह

मुंबई-गोवा महामार्गावरील दुरशेत गावच्या नदीकिनाऱ्यावर महिलेचा मृतदेह बॅगेत कोंबलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. महिलेची ओळख पटली नसून पोलीस तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

दुरशेत गावाच्या फाट्याजवळ नदीकिनारी बॅगेत मृतदेह असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा मृतदेह ताब्यात घेतला. ही महिला कोण आहे, तिची हत्या कुणी केली, तिच्यासोबत कोणता गैरप्रकार झाला आहे का? या सर्व बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या हत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलेच्या हत्येचा उलघडा करण्यासाठी पेण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना केली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत हे पुढील तपास करत आहेत.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

नदीकिनारा परिसरात याआधीदेखील एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. तसेच काही वर्षांपूर्वी ३ बंदूक मिळाल्या होत्या. नदीकिनारी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी काहीतरी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.