
पीओपीच्या गणेशमूर्तीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या तुघलकी निर्णयाविरोधात मूर्तिकारांनी आरपारचा लढा देण्याचा निर्धार केला आहे. पेण येथे एकवटलेल्या गणेश मूर्तिकारांनी आधी प्रदूषणकारी कारखाने बंद करा, मग पीओपीच्या बाप्पांवर बंदी आणा असे ठणकावले. तसेच गुजरात, पश्चिम बंगाल राज्यांमध्ये पीओपी मूर्तीनी प्रदूषण होत नाही, मग महाराष्ट्रातच कसे होते? असा सवाल खोके सरकारला करतानाच या बंदी आदेशाने एक कोटी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, हे वास्तवदेखील निदर्शनास आणून दिले. सरकारने न्यायालयात बाजू न मांडल्यास तीव्र आंदोलन करतानाच न्यायालयीन लढा देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला
पीओपीच्या गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते असे म्हणत न्यायालयाने पीओपी मूर्तीवर बंदी घातली आहे. या बंदीमुळे या व्यवसायाशी निगडित असलेले सुमारे एक ते सवा कोटी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. आम्हाला विश्वासात न घेता निर्बंध लादले जात असल्याचा आरोप मूर्तिकारांनी केला आहेत. पीओपीच्या लाखो मूर्ती परदेशात निर्यात होतात त्यामुळे देशाला परकीय चलन मिळते. या उद्योगामुळे महाराष्ट्रात शेकडो कोटींची उलाढाल होते. शासनाने न्यायालयीन लढाईत आम्हाला साथ देऊन बंदी हटवावी, अन्यथा आरपारच्या लढाईकरिता गणेश मूर्तिकार संघटना तयार असल्याचा इशारा महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे यांनी पेण येथे बोलताना दिला.
बैठकीसाठी नीलेश जाधव, मुंबई गणेश मूर्तिकार समितीचे सचिव सुरेश शर्मा, प्रवीण बावधनकर, हमरापूर विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील, माजी अध्यक्ष कृणाल पाटील, खजिनदार कैलास पाटील, सचिव राजन पाटील, नितीन मोकल आदींसह राज्यातील गणेश मूर्तिकार उपस्थित होते.
शिवसेना कायम पाठीशी
शिवसेनेचे माजी विधानसभा समन्वयक व पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी आता न्यायालयीन लढाईशिवाय पर्याय नसल्याचे सांगत शिवसेना कायम आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. राजकीय नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे व ती जिंकायची आहे. ही लढाई लढताना मतभेद, राजकारण आणू नका. कोट्यवधी कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे हा लढा सर्व ताकदीने लढा. आपला विजय निश्चित आहे असा विश्वासही धारकर यांनी व्यक्त केला.