
दुपारी वाढलेला उन्हाचा चटका, तीव्र उष्णतेच्या झळा, पहाटे जाणवणारा गार वारा, तर दुसरीकडे प्रदूषण आणि वाढत्या धुळीमुळे सध्या लहान मुले सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, घसा दुखणे, अॅलर्जी यांसारख्या आजारांनी बेजार होत आहेत. तर, उन्हाळ्यातील वाढत्या धुळीमुळे श्वसनाचेही विकार वाढले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात उघड्यावरील अन्न खाऊ नये, तसेच थंड पेये पिऊ नयेत, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी मुलांना दिला आहे. पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जणवत असल्याने घराबाहेर पडणेही मुश्कील होत आहे. दिवसभर जाणवणाऱ्या उष्ण झळा बेहाल करीत आहेत, तर रात्रीचा उकाडा घामाघूम करीत आहे. हे उष्ण वातावरण लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून, डिहायड्रेशन, लघवीला जळजळ होणे, उलटी, मळमळ, डोकेदुखी, खोकला, सर्दी, घशाच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या लहान मुलांची उपचारांसाठी रुग्णालयांच्या ‘ओपीडी’ मध्ये गर्दी वाढत आहे
लहान मुले शारीरिकदृष्ट्या नाजूक असल्यामुळे उन्हाळ्यातील उष्ण वातावरणाचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. काही वेळा तापमान नियंत्रित केंद्र निकामी होऊन ‘सनस्ट्रोक’ सारखी समस्या उद्भवू शकतो. याबरोबरच मुलांची त्वचा नाजूक असल्याने उष्णतेमुळे त्यांची त्वचा काळी पडण्याची शक्यता असते. तसेच या दिवसांमध्ये उघड्यावरील अन्नावरील विषाणू, दूषित पाणी, थंड पेयांमधील दूषित बर्फामुळे विषाणूजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
अशी घ्या मुलांची काळजी
■ मुलांना उकळून थंड केलेले पाणी द्यावे, उघड्यावरचे अन्न, बर्फयुक्त थंड पेये देणे टाळावे, शर्करायुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ देऊ नयेत, धुळीपासून मुलांचे संरक्षण करावे, घामामुळे त्वचेचे विकार उद्भवू नयेत, यासाठी मुलांना सुती व ड्राय कपडे घालावेत, थकवा, डोकेदुखी, स्नायूंमधील वेदना, चक्कर येणे यांसारख्या निर्जलीकरणाच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे, सर्दी-खोकला, श्वसनाचे विकार उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
” उन्हाळ्यात लहान मुलांना ‘सनस्ट्रोक’सारखी समस्या उद्भवू शकते. उन्हाळ्यात धुळीमुळे सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. दूषित पाणी, बर्फामुळे उलट्या, जुलाब होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. – डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ