
पाकिस्तानी क्रिकेटला संजीवनी मिळवून देण्यासाठी आपला सर्व जोर लावत मिळवलेले चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट मंडळासाठी (पीसीबी) आर्थिक संकटे वाढवणारे ठरले आहे. आधीच हिंदुस्थान खेळत नसल्यामुळे हायब्रीड मॉडेलवर स्पर्धेचे आयोजन. त्यानंतर आयोजनासाठी कमी वेळ मिळाल्यामुळे स्टेडियमच्या पुननिर्माणासाठी झालेला प्रचंड खर्च, त्यातच पाकिस्तानी संघाची लाजीरवाणी कामगिरी पीसीबीसाठी प्राणघातक ठरली आहे. एवढेच नव्हे तर पावसामुळे तीन सामने रद्द झाल्यामुळेही पीसीबीला फार मोठा फटका बसला असून आता त्यांनी रद्द झालेल्या सामन्यांच्या तिकिटांचे पैस्sै परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील दोन सामने पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करावे लागल होते तर एक सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे दोन सामन्यांच्या तिकिटांचे पैसे क्रिकेटप्रेमींना परत करण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) घेतला आहे. सर्वार्थाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पीसीबी आणि पाकिस्तानसाठी अपयशी आणि आर्थिकदृष्टय़ा दिवाळं काढणारं ठरलं आहे.
‘पीसीबी’ने प्रेस रिलीज जाहीर करत पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आतापर्यंत तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत, मात्र यातील दोन सामने एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आले. पीसीबीने या दोन सामन्यांच्या तिकिटांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एक सामना 25 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात, तर दुसरा सामना 27 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पाकिस्तान यांच्यात होता.
पीसीबीला तब्बल तीन दशकांनंतर आयसीसी स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली होती. या स्पर्धेतून ते पाकिस्तानी क्रिकेटची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारण्याचा प्रयत्न करणार होती. या स्पर्धेचे आयोजन त्यांच्यासाठी संजीवनी औषधासारखे होते. मरणासन्न अवस्थेकडे झुकत असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटला ही स्पर्धा बुस्टर वाटली होती, पण हिंदुस्थानच्या नकारघंटेनंतर पीसीबीची चोहोबाजूंनी कोंडीच झाली. ते स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर तोंडावरच पडले. पाकिस्तानी संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे तर दुबईमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील सामनाही हाऊसफुल्ल नव्हता. हिंदुस्थानच्या अन्य लढतींनाही प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद न लाभल्यामुळे स्पर्धेचे पूर्ण आयोजन फसले गेले आहे. या स्पर्धेसाठी पीसीबीने केलेला अब्जावधींचा खर्चही त्यांना कर्जात टाकणारा ठरला आहे.