पाकिस्तान क्रिकेट मंडळ कंगाल; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा जबर फटका, खेळाडूंचे मानधन लाखावरून केले हजारांत

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात कुठलीच कसर सोडली नाही, मात्र हायब्रिड मॉडेलनुसार स्पर्धेचे आयोजन, पाकिस्तानी संघाची निराशाजनक कामगिरी आणि पावसामुळे वाहून गेलेल्या सामन्यांमुळे  ‘पीसीबी’ला अब्जावधींचा जबर फटका बसला आणि त्यांचे अक्षरशः दिवाळे निघाले आहे. तिजोरीत खडखडाट असल्यामुळे पीसीबीने आपल्या खेळाडूंचे सामन्याचे मानधन एक लाखावरून थेट दहा हजारांवर आणले. एवढेच नव्हे इतर सुविधांचा दर्जाही कमी करून पैशांना कात्री लावली आहे.

पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी तीन स्टेडियमच्या नूतनीकरणावर जवळपास पाच अब्ज रुपये खर्च केले. पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनंतर आयसीसीची स्पर्धा होत असल्याने स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींची हाऊसफुल गर्दी होईल, असा पीसीबीचा अंदाज होता, मात्र पीसीबीचे सारे फासे उलटे पडले. यजमान पाकिस्तानचा संघ एकही विजय न मिळविता गट फेरीत बाद झाला. रावळपिंडीतील दोन सामने, तर नाणेफेक न होताच रद्द करावे लागले. या दोन सामन्यांच्या तिकिटांचे पैसे पीसीबी प्रेक्षकांना परत करणार आहे. त्यामुळे पीसीबीवर पैशांसाठी पुन्हा एकादा आयसीसीपुढे पदर पसरण्याची वेळ येणार असल्याचे चिन्ह आहे.

खेळाडू उपाशी, पण अधिकारी तुपाशी!

‘पीसीबी’ने केवळ आपल्या क्रिकेटपटूंचे मानधन व सुविधांनाच कात्री लावली नाही, तर खेळाडू व पंचांचे मागील हंगामातील पैसेदेखील थकविले आहेत. ‘पीसीबी’ दिवाळखोरीत निघाल्याने माजी क्रिकेटपटूंची पेन्शन योजनाही रखडली आहे. खेळाडूंच्या मानधनात गच्छंती करणारे ‘पीसीबी’चे पदाधिकारी स्वतःचे मानधन मात्र वाढवून घेत आहेत. ‘खेळाडू उपाशी पण अधिकारी तुपाशी’ अशी ‘पीसीबी’ची सध्याची गत झालीय. ‘पीसीबी’चे संघनिवड समितीचे पदाधिकारी, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेले मेंटॉर यांना मात्र वेळेत पगार मिळत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर पाच संघांसाठी नेमण्यात आलेले मेंटॉर मिसबाह उल-हक, वकार युनिस, शोएब मलिक, सरफराज अहमद व सकलेन मुश्ताक यांना महिन्याला 50 लाख रुपयांचा पगार बिनबोभाट मिळत आहे.

खेळाडूंच्या सुविधांमध्येही कपात

पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनामुळे नवसंजीवनी मिळेल अशी आशा होती, पण प्रत्यक्षात ते मोठय़ा आर्थिक संकटात कोसळले आहेत. त्यामुळे त्यांनी खेळाडूंच्या सामना मानधनाला अपमानास्पद कात्री लावली आहे. पाकिस्तानी खेळाडूंना एका सामन्यासाठी एक लाख रुपये मानधन मिळायचे. आता त्यांना फक्त दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. याचबरोबर राखीव खेळाडूंची तर केवळ पाच हजार रुपयांवर बोळवण होणार आहे. शिवाय, पीसीबीचे देशांतर्गत क्रिकेटचे प्रमुख अब्दुल्ला खुर्रम नियाजी यांनी खेळाडूंच्या सुविधांमध्येही मोठी कपात केली आहे. खेळाडूंना आधी फाईव्ह स्टार व फोर स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जायची, मात्र आता त्यांच्यावर साध्या हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या विमान प्रवास खर्चातही कपात करण्यात आली आहे.