
तामीळनाडू सरकार आणि केंद्र सरकारमध्ये हिंदी-तमीळ असा वाद पेटला आहे. या वादात आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही उडी घेतली आहे. जनसेवा पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तामीळनाडूच्या नेत्यांना पाखंडी म्हटले. एवढेच नाही तर देशाला फक्त दोनच नाही तर तमीळसह अनेक भाषांची गरज आहे, असेही ते म्हणाले. तसेच हिंदी चित्रपट डब करून चांगला पैसा कमावता, पण हिंदीला विरोध करता? असा सवालही पवन कल्याण यांनी केला. काकीनाडा जिल्ह्यात जनसेवा पक्षाच्या 12 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजात एका कार्यक्रमात ते बोलत होते.
तमीळ नेत्यांकडून राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा विरोध सुरू असून आमच्यावर हिंदी थोपली जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून पवन कल्याण यांनी तमीळ नेत्यांना चांगलेच सुनावले. देशाला तमीळसह अनेक भाषांची गरज आहे. देश अखंड रहावा आणि आपापसात बंधुभाव, प्रेम आणि एकोपा वाढावा यासाठी भाषा आणि त्याच्या विविधतेचा आपण स्वीकार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
मला हेच कळत नाही की काही लोक संस्कृत भाषेचा विरोध का करतात? तमीळ नेते हिंदीचा विरोध का करतात? खरे तर आर्थिक फायदा मिळवण्यासाठी आपण याच हिंदी चित्रपटाला डब करण्याची परवानगी देतो. त्यांना बॉलीवूडमधील पैसा हवा, पण हिंदीचा स्वीकार करत नाही. यामागील तर्क काय आहे? असा सवालही पवन कल्याण यांनी केला.
पवन कल्याण यांनी डीएमके नेत्यांचे नाव ने घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. कोणतीही गोष्ट तोडणे सोपे आहे, पण ती पुन्हा जोडणे खूप अवघड आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी देशहिताचा विचार करावा आणि उत्तर-दक्षिण असे विभाजन न करता एकोपा आणि देशाच्या अखंडतेला महत्त्व द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका