>> राकेश कुलकर्णी
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील सर्व दवाखान्यात 15 ऑगस्ट पासून सर्व उपचार, चाचण्या मोफत करण्यात आल्या आहेत. मात्र, खेकडाफेम सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच रुग्णांना उपचारासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. धाराशिव जिल्हा रुग्णालय कराराअंतर्गत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय संचालकांकडून स्पष्ट सूचना येत नाहीत तोपर्यंत रुग्णांना पैसे मोजूनच उपचार घ्यावे लागणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणार्या धाराशिव जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळत आहेत. बर्याच वेळा रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. धाराशिव जिल्ह्याचा विचार केला असता जिल्हा रुग्णालय म्हणजे आताचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या ठिकाणी सिटी स्कॅन तसेच इतर आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. धाराशिव येथील जिल्हा रुग्णालय हे मागील दोन वर्षापुर्वी सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण या विभागामध्ये झालेल्या कराराअंतर्गत सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाचा मोफत उपचाराचा निर्णय लागू झालेला नाही.
सध्या धाराशिव येथील जिल्हा रुग्णालय म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना केस पेपर काढण्यासाठी 10 रुपये आकारले जात असून महाविद्यालयामार्फत देण्यात येणार्या प्रत्येक सेवेसाठी ठराविक शुल्क आकारले जात आहे. वास्तविक या ठिकाणी रुग्ण हे ग्रामीण भागातून येतात. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांवर मोफत उपचार होणे गरजेचे आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाला पर्याय म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाचे कुठलेच रुग्णालय उपलब्ध नसल्याने नागरिकांना या दवाखान्यात उपचाराचा भार सहन करावा लागत आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांचा मतदारसंघही धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी हा मतदार संघ आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यातच रुग्णांना मोफत उपचार मिळत नसल्याने ‘दिव्याखालीच अंधार’ म्हणण्याची वेळ रुग्णावर आली आहे.
ठिकठिकाणी फलक
राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व दवाखान्यात उपचार मोफत करण्यात करण्यात आल्यामुळे रुग्ण या ठिकाणी मोफत उपचाराच्या अपेक्षेने येतात. मात्र, या ठिकाणी केस पेपर काढण्याच्या खिडकीसह इतर ठिकाणी वैद्यकीय शिक्षक संचालयाकडून शुल्क माफीबाबत अजुन सूचना किंवा पत्र प्राप्त झाले नसल्याने रुग्णांना शुल्क आकारणी सुरु राहील असे फलक लावण्यात आले आहेत.
ज्या दिवशी जिल्हा शासकीय रूग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेगळे केले जाईल त्याच दिवशी ही फिस आकरणी बंद केली जाईल. मात्र राज्याच्या आरोग्य विभागने यामध्ये काही सर्वसमावेशक धोरणाचा अवलंब करून मार्ग काढला तर सर्वसामान्य रूग्णांना दिलासा मिळू शकतो. सध्यातरी सगळी यंत्रणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हातात असल्याने रूग्णांना उपचारासाठी फिस भरावीच लागणार आहे.
– डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हाशल्य चिकीत्सक, धाराशिव.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्रात कुठेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोफत सुविधा दिल्या जात नाहीत. या ठिकाणी जिल्हा शासकीय रूग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एकत्रित असल्याने आमचा नाईलाज आहे. तरी देखील आम्ही या ठिकाणी मेडीकल कॉलेजच्या फिस रूग्णांना आकारत नाही. मात्र मोफत सुविधा देणे अशक्य आहे.
– डॉ. शिल्पा डोमकुंडवार, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
रूग्णांना आकारण्यात येणारे शुल्क
केस पेपर 10
अतिदक्षता विभाग प्रतिदिन 200 ते 500
रक्त लघवी चाचनी 35 ते 100
थायरॉईड चाचनी 60ते 250
एचआयव्ही चाचनी 50 ते 250
एक्स रे 50 ते 200
सोनोग्राफी 100ते 500
सीटी स्कॅन 300 ते 400