शिव आरोग्य सेनेच्या प्रयत्नांमुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णाच्या कुटुंबीयांनी शिव आरोग्य सेनेचे आभार मानले आहेत.
घाटकोपर पूर्व बाबली कोणेकर मार्ग येथील कर्मभूमी या वसाहतीत राहणारे किसन मराठे यांचा काही दिवसांपूर्वी अपघातात पाय फ्रॅक्चर झाला होता. शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी लाखो रुपयांचा खर्च सांगितला होता. आर्थिक परिस्थितीमुळे मराठे यांच्या कुटुंबीयांना उपचाराचा हा भलामोठा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे मराठे कुटुंबीयांनी शिव आरोग्य सेनेचे मुंबई सह समन्वयक प्रकाश वाणी व आरोग्य सेनेचे विभाग संघटक सचिन भांगे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. किसन मराठे या रुग्णाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शिव आरोग्य सेनेने दिले.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी मानले आभार
शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ.जयवंत गाडे, राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या सूचनेनुसार आरोग्य सेनेच्या शिष्टमंडळाने राजावाडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांची भेट घेत सदर रुग्णाला मदत करावी, असे आवाहन केले. परिस्थितीचे भान राखत वरिष्ठ डॉक्टरांनी किसन मराठे यांची शस्त्रक्रिया महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून करून दिली. त्यामुळे मराठे कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून त्यांनी डॉक्टरांचे तसेच शिव आरोग्य सेनेचे प्रकाश वाणी व सचिन भांगे यांचे आभार मानले.