अतिवृष्टीने विरसई बोडणीच्या नदीवरील कॉजवेवर भगदाड; रस्ताही गेला वाहून

दापोलीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने विरसई बोडणीच्या नदीवरील कॉजवेवर मोठे भगदाड पडले आहे. तसेच पुराच्या पाण्याने एका बाजूचा रस्ताही वाहून गेला आहे. त्यामुळे कॉजवेवरून प्रवास करणे आता धोक्याचे झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालूक्यात विरसई गावात रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत बोडणीच्या नदीवर एक कॉजवे आहे. या कॉजवेवर गेल्या दोन वर्षांपासून भगदाडे पडली आहेत. तात्पुरती सोय म्हणून कॉजवेवरील पडलेल्या भगदाडांमध्ये दगड माती टाकून ती बुजवली जात असत. मात्र, सध्या कोसळत असलेल्या पावसाच्या पुराच्या पाण्याने बुजवलेल्या भगदाडांमधील माती आणि दगडे वाहून गेल्याने भगदाडे पुन्हा उघडी पडली आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी आता कॉजवे धोक्याचा बनला आहे.

विरसई गावातील कोंडवाडी, फणसवाडी, सुतारवाडी आणि राणेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील बोडणीच्या नदीवरील कॉजवेवर भगदाडे पडली आहेत. तसेच एका बाजूचा रस्ताही वाहुन गेला आहे. त्यामुळे या माग्रावरील वाहतूक धोक्याची झाली आहे.