
योगगुरू बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडने अखेर रद्द करण्यात आलेल्या 14 उत्पादनांची विक्री थांबवली असल्याचे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. ज्यांचे उत्पादन परवाने एप्रिलमध्ये उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने रद्द केले होते. पतंजलीने न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाला सांगितले की, 5606 फ्रँचायझी स्टोअर्सना ही उत्पादने मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.
खंडपीठाने पतंजली कंपनीला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये कंपनीला जाहिराती काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया माध्यमांना केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे की नाही आणि या 14 उत्पादनांच्या जाहिराती मागे घेण्यात आल्या आहेत का? याबाबत सांगावे लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये पतंजलीवर कोविड लसीकरण मोहीम आणि आधुनिक वैद्यकीय पद्धतीची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.
उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, पतंजली आयुर्वेद आणि दिव्या फार्मसीच्या 14 उत्पादनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. योगगुरू रामदेव, त्यांचे सहकारी बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद यांना जारी करण्यात आलेल्या अवमान नोटीसवर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 14 मे रोजी या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता.
ही आहे उत्पादनांची यादी आहे
1- श्वासारी गोल्ड – दिव्य फार्मसी
2- श्वासरी वटी – दिव्य फार्मसी
3- ब्रॉनकॉम- दिव्य फार्मसी
4- श्वासरी प्रवाही – दिव्य फार्मसी
5- श्वासरी आवळे – दिव्य फार्मसी
6- मुक्ता वती एक्स्ट्रा पॉवर- दिव्य फार्मसी
7- लिपिडोम-दिव्य फार्मसी
8- बीपी ग्रिट- दिव्य फार्मसी
9- मधुग्रीत-दिव्य फार्मसी
10- मधुनाशिनी वटी- दिव्य फार्मसी
11- लिवामृत ॲडव्हान्स- दिव्य फार्मसी
12- लिवोग्रिट- दिव्य फार्मसी
13- पतंजली दृष्टी आय ड्रॉप- पतंजली आयुर्वेद
14- इग्रिट गोल्ड- दिव्य फार्मसी