विदेशात जाऊन भीक मागण्यात पाकिस्तान सर्वात पुढे आहे. पाकिस्तानातील भिकाऱ्यांनी युरोप, दुबईसह अनेक देशांत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या भिकाऱ्यांमुळे अनेक देश वैतागले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारने आता एक ठोस निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील 2 हजारांहून अधिक भिकाऱ्यांचे पासपोर्ट 7 वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. हे भिकारी पाकिस्तानची प्रतिमा मलीन करत आहेत, असे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे. पाकिस्तान दूतावासांकडून या भिकाऱयांची यादी तयार करण्यात आली. तसेच पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयातूनही डिटेल्स मागितली आहे. या भिकाऱ्यांमुळे पाकिस्तानी लोकांकडे जगातील लोक वेगळ्या नजरेने पाहत आहेत, असेही पाकिस्तान सरकारने म्हटले आहे.
एजंटांचे पासपोर्टही रद्द करणार
विदेशात भीक मागण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या लोकांना पासपोर्टसाठी मदत करणाऱया एजंटांचे पासपोर्टही रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तीर्थयात्रेला जायचे असे सांगून पाकिस्तानमधील जवळपास 24 व्यक्तींना भीक मागण्याच्या आरोपाखाली सौदी अरबमध्ये ताब्यात घेतले होते.