सरकारी अधिकारी पद सोडून अध्यापनाचा वसा, सातव्यांदा एमपीएससी होऊनही रोहित पवार रमले शिक्षकी पेशात

ध्येय, जिद्द अन् कष्ट करायची तयारी असेल तर सरकारी नोकरीच्या पाठीमागे धावण्याऐवजी त्या नोकऱ्यांना आपण आपल्या पाठीमागे धावायला लावू शकतो, हे चंदगड तालुक्यातील इनाम म्हाळुंगे येथील मराठी विद्यामंदिरचे प्राथमिक शिक्षक रोहित विनायक पवार यांनी दाखवून दिले आहे. ‘एमपीएससी’त सलग सात वेळा अधिकारी पदावर निवड होऊनही त्या नोकऱ्या नाकारून विद्यार्थी घडविण्याचे काम हा पठ्या करत आहे. या ध्येयवेड्या शिक्षकाचा स्पर्धा परीक्षेतील नोकरीचा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी असून, आदर्श घेण्यासारखा आहे.

रोहित पवार हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील अंजी नाईक या गावचे आहेत. केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेले वडील, तर घरकामाबरोबरच शेतीकाम करणाऱ्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या लेकरांना घडविले. रोहितने शिक्षक बनावे, अशी आई-वडिलांची तीव्र इच्छा होती. आई-वडिलांच्या इच्छेखातर रोहितने गणित विषयातून एम.एस.सी. इंग्रजी साहित्य विषयातून एम.ए. व नंतर बी.एड् केले. यानंतर चंदगड तालुक्याच्या इनाम म्हाळुंगे येथे परीक्षेच्या माध्यमातून पदवीधर अध्यापक म्हणून निवड झाली. स्पर्धा परीक्षा दिलेल्या रोहित पवार यांचे एकामागोमाग एक असे निकाल येत गेले. यातून आरोग्य विभाग (अमरावती), पदवीधर शिक्षक (कोल्हापूर), भांडारपाल जलसंपदा विभाग (नागपूर), आरोग्य सेवक (भंडारा), राज्य उत्पादन शुल्क विभाग (यवतमाळ), कारागृह शिक्षक अशा सहा जागी त्यांची एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून निवड झाली.

मंगळवारी लागलेल्या ‘एमपीएससी’च्या निकालामध्ये पुन्हा एकदा सहायक महसूल अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. सलग सातवेळा यशाला गवसणी घालूनही प्राथमिक शाळेत रमणाऱ्या रोहितसारखा एखादाच हिरा असू शकतो, असेच म्हणावे लागेल. या विक्रमी यशाबद्दल रोहित पवार यांचे विस्तार अधिकारी सुमन सुभेदार, इब्राहिमपूर केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद भादवणकर व केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले.

अपयशाला संधी समजून परिश्रम करा

■ मी सहावेळा सरकारी नोकरी सोडून दिल्याने त्या जागी अन्य उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले, यातच माझे समाधान आहे. माझे ध्येय अजूनही खूप मोठे आहे. ते मी माझ्या आत्मविश्वासाच्या जोरावर साध्य करणारच आहे. युवकांनी अपयशाला संधी समजून कठोर परिश्रम केल्यास यश नक्की मिळते. यासाठी मन, मेंदू अन् मनगटाचा योग्य वापर करावा, असा सल्ला रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.