लोकल प्रवाशांची उडाली तारांबळ! मेगाब्लॉकंमुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकमुळे रविवारी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची प्रचंड त्रेधातिरपीट उडाली. दोन्ही मार्गांवरील सर्वच स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. माघी गणेशोत्सवानिमित्त नातेवाईकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी चाललेल्या नागरिकांना या मेगाब्लॉकचा मोठा फटका बसला. लोकलचा गोंधळ पाहून अनेक प्रवाशांनी रेल्वे स्थानकातून पुन्हा रस्ते प्रवासाची वाट धरली.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान, तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते कांदिवली स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सकाळपासून दुपारपर्यंत ब्लॉक घेऊन दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले होते. एकीकडे, डोक्यावर उन्हाचे चटके आणि त्यात मेगाब्लॉकच्या ‘तापा’ची भर पडल्याने रेल्वे प्रवाशांची प्रचंड दमछाक झाली. सर्वच स्थानकांत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गर्दीचे चित्र कायम होते. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचेही हाल झाले.

z मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री फुटओव्हर ब्रिजच्या मुख्य गर्डर उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. रविवारी पहाटेपर्यंत चाललेल्या या कामाचा लोकल आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. कल्याण ते वांगणीदरम्यान 12 मीटर रुंदीच्या 7 गर्डर्सची उभारणी करण्यात आली. तसेच बदलापूर ते वांगणीदरम्यान चार गर्डर्स आणि कर्जत ते भिवपुरी रोडदरम्यान दोन पंपोझिट प्लेट गर्डर्सचे बांधकाम करण्यात आले.