मुंबईकरांचे ‘मेगा’ हाल;अनेक गाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांचा जागोजागी खोळंबा

mumbai-local-11
फाईल फोटो

नवीन वर्षाचा पहिला रविवार म्हणून कुटुंबीयांना सोबत घेऊन फिरायला बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे रविवारी प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रशासनाने उपनगरी लोकलच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेतल्याने लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. अनेक लोकल रद्द, तर सर्वच लोकल उशिराने धावल्याने प्रवाशांचा जागोजागी खोळंबा झाला. त्यामुळे दिवसाखेरीस सुट्टी वाया गेल्याच्या नैराश्यात प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतच मुंबईकरांनी घर गाठले.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रूळ दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक कामांसाठी रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक घेते. मात्र नवीन वर्षाचा पहिला रविवार असल्यामुळे रेल्वे प्रशासन मेगाब्लॉकला सुट्टी देईल, अशी आशा मुंबईकरांनी बाळगली होती. मात्र रविवारी मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनसह पश्चिम रेल्वेवरही मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉकने लोकलचे वेळापत्रक पूर्णतः विस्कळीत झाले होते. तीनही मार्गांवरील लोकल जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यातच भर म्हणजे कित्येक लोकल गाडय़ा रद्द करण्याबरोबरच काही गाडय़ा धीम्या मार्गावरून जलद मार्गावर वळवल्या होत्या. या गोंधळात गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची कुटुंबीयांसह तारांबळ उडाली. लहान मुले आणि वृद्ध सदस्यांना घेऊन हा प्रवास करताना मुंबईकरांची प्रचंड दमछाक झाली.

गर्दीमुळे धक्काबुक्की, बाचाबाचीचे प्रकार

सर्वच स्थानकांत बऱयाच वेळाने लोकल गाडय़ा धावत होत्या. परिणामी, प्रत्येक लोकलला मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते. या गर्दीत महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. गर्दीमुळे धक्काबुक्की आणि बाचाबाचीचे प्रकार जवळपास सर्वच लोकलमध्ये घडले. अनेक कुटुंबीय नवीन वर्षाचा पहिला रविवारी म्हणून देवदर्शनासाठी घराबाहेर पडले होते. त्यांना प्रवासातील वाईट अनुभव घेऊनच सकाळी मंदिर आणि सायंकाळी घर गाठावे लागले. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कार्यपद्धतीवर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बेस्ट बसच्या थांब्यांवरही गर्दी

रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे कित्येक प्रवाशांनी बेस्ट बसच्या प्रवासाला पसंती दिली होती, मात्र तिथेही तीच परिस्थिती होती. बसगाडय़ा वेळेवर येत नव्हत्या. त्यामुळे बेस्ट बसच्या थांब्यांवरही गर्दी झाल्याचे चित्र रविवारी सकाळी शहर आणि उपनगरांत पाहायला मिळाले. बेस्ट प्रशासन रविवारी अनेक बसफेऱ्या रद्द करते. बेस्ट प्रशासनाने रेल्वेच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक विचारात घेऊन अतिरिक्त बसेस चालवाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली.