
लोकल प्रवासात प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप, पॅमेरा शिताफीने चोरून पसार होणाऱया रंगराम चौधरी (46) या चोराच्या रेल्वे गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. तो मूळचा राजस्थानचा आहे. त्याच्याकडून चोरीचा चार लाख 31 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
भांडुप येथे राहणारा फरहद शेख (25) हा तरुण लोकलने प्रवास करत असताना त्याचा मोबाईल चोरीला गेला होता. त्याने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, लोकलमध्ये चोरीचे प्रकार वाढू लागल्याने गुन्हे शाखेने त्याची गंभीर दखल घेतली. प्रभारी निरीक्षक अरशुद्दीन शेख व निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक शिंदे तसेच कृष्णराव चव्हाण, रवींद्र दरेकर व पथकाने तपास सुरू केला. अंबरनाथ येथे राहणारा व मूळचा राजस्थानचा असलेला रंगाराम चौधरी याने चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्याने केलेल्या चार गुह्यांची उकल झाली. त्याच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, पॅमेरे असा चार लाख 31 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.