
उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर लोकल वाहतुकीच्या वेळापत्रकाचा रविवारी संपूर्ण दिवसभर बोजवारा उडाला. कांदिवली-बोरिवली स्थानकांदरम्यान गर्डर कामासाठी घेतलेल्या ‘ब्लॉक’मुळे पश्चिम रेल्वे कोलमडली, तर मध्य रेल्वे व हार्बर लाईनचे वेळापत्रक नियमित मेगाब्लॉकमुळे बिघडले. यात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकलची गर्दी, रेटारेटी व प्लॅटफॉर्म बदलासाठी धावाधाव या त्रासाने प्रवाशांच्या सुट्टीच्या आनंदावर पाणी फेरले.
पश्चिम रेल्वेने शनिवारी दुपारपासून घेतलेल्या मेगाब्लॉकचा रविवारी विशेष परिणाम जाणवला. सुट्टीनिमित्त कुटुंबीयांसह घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची सर्वच स्थानकांत गर्दी झाली. ब्लॉककाळात मोठ्या प्रमाणावर लोकल रद्द केल्या होत्या. जवळपास अर्धा तास उशिराने गाड्या धावू लागल्या. त्यामुळे प्रत्येक लोकलमध्ये रेटारेटीचा त्रास सहन करावा लागला. यात लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रशासनाने कित्येक लोकलचे मार्ग वळवले.
लोकल अचानक दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची उद्घोषणा ऐकून प्रवाशांना धावाधाव करावी लागली. रात्री 12 वाजेपर्यंत हा त्रास प्रवाशांच्या वाट्याला आला होता. हेच हाल मध्य रेल्वे आणि हार्बरवरील प्रवाशांनी सहन केले. मेन लाइनवर विद्याविहार ते ठाणे तसेच हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. दोन्ही मार्गांवर चार ते पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आल्याने त्याचा मोठा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला.
बेस्ट बस प्रवासातही मुंबईकरांचे हाल
पश्चिम रेल्वेने 35 तासांचा ब्लॉक घेतल्याने अनेक मुंबईकरांनी बेस्ट प्रवासाकडे मोर्चा वळवला होता. मात्र बेस्ट बसही वेळेवर धावत नव्हत्या. त्यामुळे बेस्ट बसचा पर्याय निवडलेल्या प्रवाशांची उन्हात दमछाक झाली.
लग्नसराईत ब्लॉकच्या शेड्यूलमध्ये बदल करा
रेल्वे प्रशासन देखभाल-दुरुस्तीसाठी दर रविवारी दिवसा ब्लॉक घेते. त्यामुळे सुट्टीत लोकल प्रवास डोकेदुखीचा ठरत आहे. एप्रिल व मे महिन्यात लग्नाचे अनेक मुहूर्त असतात. अशा समारंभांना कुटुंबीयांना सोबत घेऊन जाताना प्रचंड हाल होतात. याचा विचार करून रेल्वेने उन्हाळी हंगामातील दोन महिन्यांत ब्लॉकच्या शेड्यूलमध्ये बदल करावा, शक्यतो रात्री देखभाल-दुरुस्ती कामे करावीत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.