कोस्टल रोडवर बेस्टला अजूनही ‘नो एण्ट्री’, बस सुरू करा; मुंबईकरांची मागणी

कोस्टल रोडवरून दुतर्फा वाहतूक सुरू झाली असून नरीमन पॉइंट ते वांद्रेपर्यंत अवघ्या 15 मिनिटांचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र या मार्गावरून अजूनही बेस्ट बस सुरू झाली नसल्यामुळे मुंबईकरांना या मार्गाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर या मार्गावर बेस्ट बस सुरू करा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

कोस्टल रोडच्या उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या मार्ंगकेवरून वाहतूक सुरू झाली आहे. श्यामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते वांद्रे असा उत्तर दिशेने आणि वांद्रे ते श्यामलदास गांधी मार्ग असा दक्षिण दिशेने म्हणजेच दुतर्फा प्रवास सुरू झाला आहे. या मार्गावर बेस्टची बस सेवा सुरू करण्यासाठी मार्गिका आहे. मात्र बेस्ट प्रशासनाने बस सेवा अद्याप सुरू केलेली नाही.

महाव्यवस्थापकाची जागा रिक्त

मुंबई आणि पश्चिम उपनगरात कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी कोस्टल रोड हा महत्त्वाचा मार्ग आहे. सामान्य मुंबईकरांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. मात्र बेस्ट बस सुरू झाल्या नसल्याने मुंबईकरांची गैरसोय होत आहे. बेस्टला सध्या महाव्यवस्थापक नसल्याने कोस्टल रोडवरून बेस्ट बस सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी बेस्टमध्ये सक्षम अधिकारी नाही. त्यामुळे या मार्गावर बेस्ट सुरू करण्याचा निर्णय प्रलंबित आहे.