
देशातील प्रमुख शहरातील विमानतळांवर चहा आणि नाश्ता करण्यासाठी भरमसाठ पैसे मोजावे लागतात हा अनेकांचा अनुभव आहे, परंतु आता दिल्ली विमानतळावर प्रवाशांना केवळ 10 रुपयांत चहा आणि 20 रुपयांत समोसा मिळू शकणार आहे. प्रवाशांची महागडय़ा खाद्यपदार्थांपासून सुटका व्हावी या उद्देशाने सर्वात आधी कोलकाता विमानतळावर 19 डिसेंबरपासून याची सुरुवात करण्यात आली होती. प्रवासी कॅफे नावाने चेन्नईत पहिला कॅफे सुरू करण्यात आला होता. कोलकाता, चेन्नई, दिल्लीनंतर आता मुंबई विमानतळावरसुद्धा हे कॅफे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, हे कॅफे चेन्नई एअरपोर्टच्या डोमेस्टिक टर्मिनल-1 वर चेक इनच्या आधी उघडण्यात आले आहे. या ठिकाणी 10 रुपयांमध्ये चहा आणि पाण्याची बॉटल तसेच 20 रुपयांत समोसा, कॉफी आणि मिठाई खरेदी करता येऊ शकते. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी गुरुवारी चेन्नई विमानतळावर उड्डाण प्रवासी कॅफेचे उद्घाटन केले, तर त्याआधी 19 डिसेंबरला कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या कॅफेचे उद्घाटन करण्यात आले होते.
डोसा 300 तर, पावभाजी 250 रुपयांना
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी विमानतळावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या भरमसाठ किमतीवरून चिंता व्यक्त केली होती. कोलकाता विमानतळावर गरम पाणी आणि टी बॅगची किंमत 340 रुपये आहे, तर दिल्ली विमानतळावर पाण्याच्या
बॉटलसाठी 50 रुपये, समोसा 150 रुपये, एक डोसा 300 रुपये, तर पावभाजीसाठी 250 रुपये मोजावे लागतात, असे चिदंबरम यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करून म्हटले होते. केंद्रीय उड्डाणमंत्र्यांनी वर्षभरानंतर का होईना, पण दखल घेत विमानतळावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.