काळ्या जादूने मुंबईच्या आंतरदेशीय विमानतळावर खळबळ उडाल्याची घटना घडली. मुंबई ते श्रीनगर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाने हे विमान जाणार नाही आणि कोणीच वाचणार नाही असे सांगितल्यावर तपास यंत्रणा सतर्क झाल्या. विमानतळ अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाची कसून चौकशी केली. त्या प्रवाशावर काळी जादू झाल्याने तो नैराश्यात असल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी त्या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मुंबईच्या आंतरदेशीय आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज हजारो विमानांची उड्डाणे होत असतात. गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब, आत्मघातकी बॉम्बचे ट्विट आणि अफवेचे फोन विमान कंपन्यांना येऊ लागले आहेत. त्या घटनांमुळे प्रवाशांना नाहक त्रास होतोच, पण विमान कंपन्यांनादेखील तोटा सहन करावा लागत आहे. रविवारीही तशीच घटना घडली. संबंधित प्रवासी मूळचा जम्मू-कश्मीरचा रहिवासी आहे. विमानतळ पोलिसांनी त्या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद केला.