गेल्या काही दिवसांत रस्त्यावर बेस्टने ठोकर दिल्याने प्रवासी-पादचाऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या असताना आता शेकडो बेस्टमधील सीसीटीव्ही बंद असल्याने प्रवाशांची सुरक्षा वाऱयावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बेस्टच्या ताफ्यातील 2889 गाडय़ांपैकी साडेचारशेहून अधिक बसेसमधील सीसीटीव्ही पॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्व बसमध्ये पॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्टमध्ये दररोज सुमोर 35 लाखांवर प्रवासी प्रवास करतात. या बेस्ट प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता बेस्टच्या ताफ्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक एसी बसेस दाखल करण्यात येत आहेत. या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गाडीत सीसीटीव्ही बसवण्याचे धोरणही राबवण्यात येत आहे. सद्यस्थितीत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील अशा 2,889 बसेस प्रवासी सेवेत धावतात. यामध्ये भाडेतत्त्वावरील गाडय़ांचा समावेश सर्वाधिक आहे. या भाडेतत्त्वावरील बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र शेकडो बसेसमधील पॅमेरे बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशी आहे स्थिती
बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या 989 बसेसपैकी 67 बसेसमध्ये सीसीटीव्ही पॅमेरे बसवले असून 25 बसेसमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. भाडेतत्त्वावरील 1,900 बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून 420 बसेसमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नसून बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद असून सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात येतील, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.