
शरीरसौष्ठवात उंचीच्या गटाचे अस्तित्व वाढवण्यासाठी धडपडत असलेल्या मुंबईच्या हौशी शरीरसौष्ठव संघटनेने पसायदान संस्थेच्या सहकार्याने रविवार, 6 एप्रिलला ‘पसायदान श्री’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या स्पर्धेचे दिमाखदार आयोजन काळाचौकीच्या अभ्युदयनगरात केले जाणार आहे. आजच्या युवा पिढीमध्ये शारीरिक स्वास्थ्य आणि व्यायामाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या ध्येयानेच पसायदान मुंबईने अभ्युदयनगरच्या शहीद भगतसिंह मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती पसायदानचे संस्थापक प्रशांत काणकोणकर यांनी दिली.
‘पसायदान श्री’ स्पर्धेत मुंबईच नव्हे तर राज्यातील हौशी शरीरसौष्ठवपटू मोठया संख्येने सामील व्हावेत म्हणून वजनी गटाची संस्था असलेल्या महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचेही सहकार्य लाभणार आहे. वजनी गटाच्या अनेक संघटना आहेत, त्यामुळे त्यांचे खेळाडू एकमेकांच्या स्पर्धांमध्ये खेळत नाहीत. जर कुणी खेळण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंना आपले पीळदार स्नायू दाखवता यावेत, आपले कौशल्य लोकांसमोर सादर करता यावेत म्हणून आम्ही सर्व संघटनांच्या खेळाडूंना खेळण्याचे आवाहन केल्याचे हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव नंदकुमार तावडे यांनी सांगितले.
हेवेदावे विसरून स्पर्धेला या
महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव सुरेश कदम यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या वजनी गटातील दमदार आणि पीळदार खेळाडूसुद्धा या स्पर्धेत उतरून एक नवा पायंडा पाडणार आहेत. संघटनांच्या वादात खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून आपल्या वजनी गटातील खेळाडूंना उंचीच्या या स्पर्धेत उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाहून मुंबईतील अन्य संघटनांनीही आपापसातील हेवेदावे विसरून खेळाडूंना सर्व संघटनांच्या स्पर्धांमध्ये खेळण्याची विनाअट परवानगी द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव सुरेश कदम यांनी सर्व शरीरसौष्ठव संघटनांना केले आहे.