शिवसेनेच्या बाजूने वारं फिरलंय! ‘मातोश्री’ची ओढ; परशुराम उपरकर स्वगृही, वाशीम आणि दिग्रसमध्येही ताकद वाढली

विधानसभा निवडणूक जाहीर होताच महाराष्ट्रातील सर्व वारे शिवसेनेच्या दिशेने वळले आहेत. दिशाभूल झाल्याने इतरत्र गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना पुन्हा ‘मातोश्री’ची ओढ लागली आहे. बरोबरच इतर पक्षांतूनही हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे.

गद्दार आणि मिंध्यांनी दिशाभूल केल्याने मध्यंतरीच्या काळात भरकटलेल्या जुन्या शिवसैनिकांची पावले आता पुन्हा ‘मातोश्री’कडे वळली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मोठय़ा मनाने त्यांच्या हाती शिवबंधन बांधून आणि हाती मशाल देऊन पुन्हा सन्मानाने पक्षात प्रवेश देत आहेत. अन्य पक्षांमधील कार्यकर्तेही शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत आहेत.

शिवसेना सोडून मनसेत गेलेले आणि काही महिन्यांपूर्वी मनसेलाही रामराम केलेले कोकणातील माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. ‘सुबह का भुला शाम को घर लौट आया तो उसे भुला नही कहते,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपरकर यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. कोकणात शिवसेनेचा भगवा कायम फडकत राहिला पाहिजे यासाठी जोमाने काम करा, असे त्यांनी उपरकर यांना सांगितले.

मशालीने लोकसभेत दिल्लीश्वरांच्या बुडाला आग लावली, आताही लावणार! उद्धव ठाकरे गरजले

वाशीम आणि दिग्रस येथील डॉ. सिद्धार्थ देवळे, अॅड. सुधाकर देशमुख यांनीही त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करतानाच मार्गदर्शनही केले. विधानसभेत आपला विजय निश्चित असून आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, खासदार संजय देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.