पारनेर तालुक्याला 121 कोटी रूपये खरीपाचा पिक विमा, खासदार नीलेश लंके यांची माहिती

मागील सन 2023 मधील पिक विम्यापोटी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 121 कोटी रूपयांचा पिक विमा मंजुर झाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वी 16 कोटी 50 लाख रूपयांचा सोयाबिन पिकासाठीचा विमा जमा झाला असून आता उर्वरीत पिकांसाठी 105 कोटी रूपये असा एकूण 121 कोटी रूपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

कोणत्या पिकासाठी किती विमा याची मंडलनिहाय आकडेवारी लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. तालुक्यातील हवामान तसेच नैसिर्गीक स्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ व्हावा यासाठी खा. नीलेश लंके यांनी शासनाकडे पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा केला होता. शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा यासाठी खा. लंके हे नेहमीच प्रयत्नशिल असतात. त्याचाच एक भाग म्हणून पिक विम्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खासदार लंके यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाठपुरावा केला होता.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात मुग, सोयाबिन, बाजरी, तुर, कांदा, उडीद या 71 हजार 255 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा 57 हजार 185 शेतक-यांनी विविध 1 लाख 48 हजार 834 आवेदनपत्रांद्वारे पिक विमा उतरविला होता. दरम्यान, पिक विमा उतरविल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबिनची अग्रीम रक्कम म्हणून 16 कोटी 50 लाख रूपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरीत 105 कोटी रूपये इतकी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पिक विम्यासंदर्भात काही अडचण असल्यास आपल्या पारनेर शहरातील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले आहे.