![prayagraj traffic jam](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/prayagraj-traffic-jam-696x447.jpg)
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. 144 वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे प्रयागराजमध्ये पोहोचत आहेत. भाविक मिळेल त्या साधनाने प्रयागराज शहराकडे येत असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गांवर 300 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे भाविकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. याची दखल आता संसदीय लोकलेखा समितीनेही घेतली आहे. या समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर (एनएचएआय) ताशेरे ओढले आहेत.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी वाहतुकीचे नियोजन न केल्याबद्दल संसदीय लोकलेखा समितीने एनएचएआयवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रयागराज येथे वाहतुकीची महाकोंडी झाल्याचे दिसले होते. जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी प्रयागराज येथे झाली होती. जवळपास 300 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या वाहतूक कोंडीमुळे संसदीय लोकलेखा समितीने चिंता व्यक्त केली आहे.
प्रयागराजकडे जाणाऱ्या मार्गावरील टोल का माफ केला नाही? असा सवाल काँग्रेस नेते, खासदार केसी वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय लोकलेखा समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केला आहे. या वाहतूक कोंडीमध्ये भाविकांचे हाल होत असून पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि खाद्यपदार्थ यांचाही अभाव दिसून आला आहे.
एनएचएआयला टोलच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते, मग वाहनचालकांच्या समस्यांबाबत इतके असंवेदनशील कसे वागू शकतात? अधिकाऱ्यांनी वाहतुकीची योग्य व्यवस्था आणि नियोजन का केले नाही? असा सवाल संसदीय लोकलेखा समितीचे प्रमुख केसी वेणुगोपाल यांनी केला.
View this post on Instagram
दरम्यान, 13 जानेवारीपासून महाकुंभमेळ्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत जवळपास 50 कोटी भाविकांनी गंगेत स्नान केले आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी देशासह विदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराजकडे येत आहेत. यामुळे यात्रेकरूंच्या वाहनांच्या महामार्गावर रांगा लागल्या आहेत. याचे व्हिडीओही व्हायरल झाले असून एका व्हिडीओमध्ये पोलीस वाहतुक कोंडीमुळे भाविकांना घरी जाण्यास सांगत असताना दिसत आहेत.
View this post on Instagram