संसदेच्या दोन्ही सभागृहांत अधिवेशन सुरू झाल्यापासून चार दिवसात केवळ 40 मिनिटे कामकाज चालले. अदानी लाचखोरीप्रकरणी संसदेत चर्चेची मागणी आजही विरोधकांनी लावून धरली. याशिवाय मणिपूर आणि उत्तर प्रदेशातील संभळ प्रकरणीही प्रचंड गदारोळ झाला. लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु, विरोधक आणखीनच आक्रमक झाले. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांतील कामकाज काही मिनिटांतच सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. अशाप्रकारे अधिवेशनाचा पहिला आठवडा अदानीमुळे वाया गेल्याचे चित्र होते.
संसदेतील गदारोळावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेतील गदारोळाबद्दल चिंता व्यक्त केली. आशा आहे की सर्व सदस्य सभागृहाचे कामकाज चालू देतील. देशातील जनता संसदेबाबत चिंता व्यक्त करत आहे. सभागृह सर्वांचे आहे. देशाला संसद चालवायची आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनीही नाराजी व्यक्त करत आपण अत्यंत वाईट उदाहरण मांडत आहोत. आपले काम लोककेंद्रित नाही, असे धनखड म्हणाले आणि कामकाज तहकूब केले. दरम्यान, संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा अपवाद वगळता एकही दिवस संसदेचे कामकाज सामोपचाराने चालू शकले नाही.
एकूण 16 विधेयके मांडणार
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 16 विधेयके मांडली जाणार असून 11 विधेयके चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहेत. तर 5 कायदे मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहेत. वन नेशन वन इलेक्शनसाठी प्रस्तावित केलेल्या विधेयकांचा संच अद्याप सूचीबद्ध नाही. सरकारने हे विधेयक अधिवेशनात मांडण्यात येईल, असे म्हटले होते. दरम्यान, लोकसभेने मंजूर केलेले अतिरिक्त विधेयक, भारतीय विमान विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे राज्यसभेच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
वक्फ बोर्डाबाबतच्या जेपीसीला मुदतवाढ
सरकारने वक्फ बोर्डासंदर्भात खासदार जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वाखालील जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीला पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. याबाबत आज जगदंबिका पाल यांनी प्रस्ताव मांडला. त्याला लोकसभेने मंजुरी दिली.
चार दिवसांत काय कामकाज झाले?
- 25 नोव्हेंबर रोजी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पहिल्या दिवशी राज्यसभा सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात वाद झाला. पहिल्या दिवशी अदानी लाचखोरी प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करण्यात आले.
- दुसऱ्या दिवशी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला. 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गदारोळ झाला. उत्तर प्रदेशातील संभळमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुद्दाही विरोधकांनी उचलून धरला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज होऊ शकले नाही. कित्येक तास कामकाजाविना वाया गेले.
- 28 नोव्हेंबर रोजी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी संविधानाची प्रतही हातात ठेवली होती. नांदेडच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले रवींद्र चव्हाण यांनीही शपथ घेतली. त्यानंतर काही मिनिटांतच पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात अदानी लाचखोरीप्रकरण, मणिपूर आणि संभळमधील हिंसाचार यावरून विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज पुन्हा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.