तिसऱ्या दिवशीही अदानीवरून गदारोळ, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज काही मिनिटांत गुंडाळले

उद्योजक गौतम अदानी यांच्या अमेरिकेतील लाचखोरीप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा करण्याची मागणी लावून धरत विरोधकांनी आज तिसऱया दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. याप्रकरणी सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेण्याची मागणीही पुन्हा करण्यात आली. त्याचबरोबर मणिपूर आणि उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचारावरून प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरुवातीला 50 मिनिटे आणि नंतर पुन्हा गदारोळ सुरू होताच काही मिनिटांतच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरुवातीला 50 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधकांनी सरकारविरोधात प्रचंड हंगामा केला, सरकारविरोधात घोषणाबाजी केली, निदर्शने केली. त्यामुळे अखेर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, यावेळी वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत वाढवण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार आहे.

रवींद्र चव्हाण यांची मराठीतून शपथ

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा सदस्यत्वाची मराठीतून शपथ घेतली. रवींद्र चव्हाण यांच्या हातातही संविधानाची प्रत होती.

प्रियांका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ

केरळच्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या केरळी कासवू साडीची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यांनी हिंदीतून शपथ घेतली. यावेळी काँग्रेस खासदारांनी जोडो जोडो, भारत जोडो अशा शब्दांत प्रियांका गांधी यांचे स्वागत केले. यावेळी प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा आणि मुलगा रीहान तसेच मुलगी मिराया लोकसभेच्या गॅलरीत उपस्थित होते.

संसदेत काय घडले…

लोकसभेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी आणि रवींद्र चव्हाण यांच्या शपथविधीच्या काही वेळानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अदानी लाचखोरीप्रकरणी चर्चेची मागणी लावून धरली. तसेच संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारप्रकरणी कारवाई करण्याची तसेच मणिपूरमधील हिंसाचाराबाबत चर्चेची मागणी करण्यात आली. कामकाजादरम्यान विषय सूचीबद्ध करताना अदानी, मणिपूर, संभल हिंसाचारप्रकरणी 267 कलमांतर्गत चर्चेसाठी तब्बल 16 नोटिसा आल्या. परंतु, या सर्व नोटिसा फेटाळून लावण्यात आल्या. त्यामुळे विरोधकांनी प्रचंड हंगामा केला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मुंद्रा पोर्टवर काँग्रेसची धडक

अदानींच्या अटकेच्या मागणीसाठी गुजरातमधील अदानीच्या मुंद्रा पोर्टबाहेर युवक काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी लाठीमार करत काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली व त्यांना व्हॅनमध्ये डांबले. तुम्ही लाठीच्या धाकाने आमचा आवाज दाबू शकत नाही, असे कार्यकर्त्यांनी यावेळी पोलिसांना सुनावले.