”सत्ताधारी पक्षाने महाराष्ट्रात बोर्ड लावून रेल्वे स्टेशनची नावं बदलल्याचं श्रेय घेतलं, पण अजूनही कागदपत्रांवर जुनीच नाव दिसतं आहेत. मग नावं खरंच बदलली आहेत की नाही, असा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी आज संसदेत उपस्थित केला आहे. आज लोकसभेत रेल संशोधन विधेयक, 2024 वर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान त्यांनी रेल्वे खात्याकडील प्रलंबित मागण्यांची यादीही संसदेत सादर केली.
संसदेत बोलताना अरविंद सावंत यांनी रेल्वे सुरू करणाऱ्या नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचे रेल्वे स्थानकास नाव देण्याची मागणी यावेळी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी त्यांनी केली. संसदेत बोलताना ते म्हणाले की, ”हिंदुस्थानात रेल्वे सुरु करणारे हे नाना शंकरशेठ होते. तुम्ही केवडिया स्टेशनचं नाव बदललं, यातच नाना शंकरशेठ यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन देण्यासाठी स्वतः राज्य सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव पास केला, तुम्हाला दिला, मात्र अजून त्याचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन देण्यात आलं नाही. यात तुम्हाला काय अडचण आहे, हे मला कळत नाही.”
सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी मी वारंवार करत आहे. तुम्ही केवडिया स्टेशनचं नाव बदललं, तिथे आदरणीय सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा आहे. मग येथे का नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाऊ शकत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय रेल्वेच्या मोकळ्या जमिनीवर वसलेल्या झोपड्यांचे पुनर्वसनासंदर्भात धोरण आणावं, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच रेल्वे बोर्डाच्या स्वायत्ततेबाबतही बोर्ड स्वतंत्र राहणार की, त्यात सरकारचा हस्तक्षेप राहणार, हा महत्त्वपूर्ण प्रश्नही अरविंद सावंत उपस्थित केला.