
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या कबड्डीच्या चढाया-पकडींच्या खेळात पार्ले स्पोर्ट्स क्लबने स्पर्श फाऊंडेशनविरुद्धचा अंतिम सामना 29-29 असा बरोबरीत सुटल्यानंतर सुवर्ण चढाईत पार्ले स्पोर्ट्स क्लबने बाजी मारली आणि शिवसेना-युवासेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत गोकुळवन मित्र मंडळाच्या रौप्य महोत्सवी आयोजित आमदार चषक प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. द्वितीय श्रेणी पुरुषांच्या गटात श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळाने दत्तगुरू मंडळाचा पराभव करीत जेतेपदाला गवसणी घातली.
आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेत 32 संघांनी आपला जोर दाखवला होता. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, शाखाप्रमुख संदीप जाधव, संपत मोरे, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, गणपत वारिसे, प्रशांत कदम, सायली प्रभू, आशीष तावडे, प्रणय येलवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या रोमहर्षक स्पर्धेत प्रथम श्रेणीत पार्ले स्पोर्ट्स क्लबचा अभिषेक यादवला तर द्वितीय श्रेणीत श्री सिद्धिविनायकचा ओम कुदळे सर्वोत्तम खेळाडू ठरला. उत्कृष्ट चढाईपटूचा मान इशान शिंदे आणि हर्ष सातोपेने मिळवला तर पकडीत ओमकार सुतार, हर्ष गुरव विजेते ठरले.