मुंबईत पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने पार्किंग घोटाळा, सुनील प्रभू यांचा आरोप

दक्षिण मुंबईत ट्रायडंट हॉटेलसमोर मध्यरात्री 2 वाजेपर्यंत कार पार्किंग सुरू आहे. त्याशिवाय स्टेटस हॉटल, क्रॉफर्ड मार्पेट, वरळी नाका व हायवेच्या पुलाखाली अनधिकृत कार पार्किंग सुरू आहे. वाहनचालकांना बोगस पावत्या दिल्या जातात. मुंबई पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोटय़वधी रुपयांचा कार पार्किंग घोटाळा सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत केला.

माहितीच्या मुद्दय़ाद्वारे सुनील प्रभू यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, या पार्किंगमध्ये भरमसाट पैसे आकारून जनतेची लूट सुरू आहे. हे पार्किंग कोण चालवतो, त्याचे पैसे कोण स्वीकारतो हे कोणलाही माहिती नाही. स्टेटस हॉटेल, क्रॉफर्ड मार्पेट, वरळी नाका ओव्हर हायवे ब्रीजखालील जागेत अनधिकृत वाहन तळ चालवण्यात येत असून त्याचा पैसा हा अख्तर व संतोष पांडे या दोन व्यक्ती घेतात. यामध्ये महापालिकेचे संबंधित वॉर्ड ऑफिसर यांच्या संगनमताने हा वाहनतळ चालवण्यात येत आहे. यामध्ये एकही मराठी माणूस नसून सर्व परप्रांतीय आहेत. दुचाकी वाहनाचे दोनशे रुपये तर चारचाकी वाहनाचे 250 रुपये आकारतात. याच्या पावत्याही बोगस असल्याचे प्रभू यांनी निदर्शनास आणले.

मुंबई पालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व निविदा न काढता महापालिकेचे अधिकारी हे अख्तर व संतोष पांडे या दोन व्यक्तींना पदाचा दुरुपयोग करून वाहनतळ चालवण्यास बेकायदा परवानगी दिली आहे. यातून कोटय़वधी रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्यात येत आहे. शासनाने याची त्वरित दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.