
पॅरिस ऑलिम्पिक पदकविक्रम करण्यासाठी हिंदुस्थानी अॅथलीट्सला सर्वोत्तम सुविधा पुरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न क्रीडा मंत्रालय, आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी केला. अॅथलीट्स आणि संघटनांमध्ये प्रचंड ताळमेळ पाहायला मिळूनही काही टीकाकारांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त करत टीकाकारांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
क्रीडा मंत्रालयाने 26 जुलैपासून सुरू होणाऱया जागतिक क्रीडा महोत्सवासाठी हिंदुस्थानच्या 117 अॅथलीट्स आणि 140 क्रीडा सहाय्यकांच्या महापथकाला मंजुरी दिली आहे. यात खासगी प्रशिक्षक, मानसोपचारतज्ञ आणि फिजीओसह प्रसिद्ध क्रीडा चिकित्सक डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्या नेतृत्वाखाली 13 सदस्यांचे क्रीडा विज्ञान पथकही नेमण्यात आले आहे.
हिंदुस्थानच्या महापथकाकडून महापराक्रमाची सर्वांनाच अपेक्षा आहे. यंदाचे पथक टोकियोपेक्षा सर्वोत्तम कामगिरी करतील, असा दृढ विश्वास व्यक्त केला जात आहे. याबाबत उषा म्हणाल्या, आयओएने एका नव्या युगात प्रवेश केला असून इथे फक्त आणि फक्त खेळाडू केंद्रस्थानी आहेत. खेळाडूंची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत असताना काही टीकाकारांनी नकारात्मक गोष्टी पसरवल्या आहेत. क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने आम्ही सर्वांनी मिळून जबरदस्त टीमवर्क केला आहे. इतकं सारं सर्वोत्तम करूनही काहींना या गोष्टीचे जराही कौतुक न वाटणे, ही बाब पटत नसल्याचे मत उषा यांनी बोलून दाखवले.
अंतिम पंघाल सहकाऱयांच्या व्हिसाच्या प्रतीक्षेत
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सहा कुस्तीपटूंपैकी एक असलेल्या अंतिम पंघालच्या चार सदस्यीय सहकारी स्टाफला अजूनही व्हिसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे तिच्या सरावात अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उषा यांनी बरखास्त झालेल्या कुस्ती महासंघाच्या सुस्त कारभाराला दोषी मानले आहे. पंघालच्या सरावासाठी गैरमान्यता असलेल्या सपोर्ट स्टाफची निवड करण्याचा प्रकाराचाही आपण समाचार घेणार असल्याचे त्या म्हणाला. कुस्ती महासंघाच्या अधिकाऱयांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि सहयोगी स्टाफची खूप मोठी यादी मंजूर केली, पण अंतिमच्या फिजिओ आणि प्रशिक्षकाची नावे मंजूर करणे महत्त्वाची समजले नाही. हा सारा प्रकार विचित्र असल्याचेही त्या म्हणाल्या.