
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचा रोमांच संपला. विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस, युरो चषक अन् कोपा अमेरिका या फुटबॉल स्पर्धेंचा थरारही संपला. आता पॅरिस ऑलिम्पिकचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे. हिंदुस्थानचे महापथक ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीसाठी पॅरिसभूमीत दाखल होताहेत, पण त्यात अॅथलेटिक्सचे 29 सदस्यीय महापथक बाहुबली कामगिरीसाठी सज्ज झालेत. भालाफेकपटू नीरज चोप्रासह अविनाश साबळे, पारुल चौधरी आणि 4 बाय 400 मीटरची रिले टीम पदकांची दावेदार आहे. त्यामुळे टोकियोचा पदकपराक्रम पॅरिसमध्ये मोडला तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने अॅथलेटिक्समध्ये 25 खेळाडूंचा चमू पाठविला होता. मात्र यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे 29 अॅथलिट कौशल्य पणाला लावणार आहेत. यावेळी सर्वांच्या नजरा या नीरज चोप्राच्या भालाफेकीवर असतील. या वर्षीच्या टॉप-10 भालाफेकपटूंमध्ये नीरज चौथ्या क्रमांकावर आहे. 88.36 मीटर भालाफेक ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी होय. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भालाफेक करीत सुवर्णपदक जिंकले होते. नीरजचे पुढील लक्ष्य हे 90 मीटर भालाफेकीचे होते, मात्र हा आकडा अद्यापि या ‘गोल्डन बॉय’ला गाठता आलेला नाही. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज कुठल्या पदकाला गवसणी घालणार, याकडे तमाम देशवासीयांच्या नजरा असतील.
पॅरिस ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानी पथक
पुरुष ः अविनाश साबळे (3000 मीटर स्टीपलचेज), नीरज चोप्रा, किशोर जेना (भालाफेक), तेजिंदर पाल तूर (गोळाफेक), प्रवीण चित्रावेल, अबुबाकर (तिहेरी उडी), सर्वेश कुशारे (उंच उडी), अक्शदीप, विकास सिंह, परमजीत सिंह (20 किलोमीटर चालणे शर्यत), मोहम्मद अनस, मोहम्मद अजमल, अमोज जैकब, संतोष, राजेश रमेश, मिजो चाको (4 बाय 400 मीटर रिले), सूरज पंवार (मिश्र चालणे मॅरेथॉन), जेस्विन एल्ड्रिन (लांब उडी).
महिला ः किरण पाहल (400 मीटर), पारुल (3000 मीटर स्टीपलचेज, 5000 मीटर), ज्योती (100 मीटर अडथळा शर्यत), अनु राणी (भालाफेक), ज्योतिका, शुभा, विद्या रामराज, पूवम्मा, प्राची (4 बाय 400 मीटर रिले), प्रियंका गोस्वामी (चालणे शर्यत), अंकिता ध्यानी (5000 मीटर).
पुरुष रिले संघाकडून आशा
नीरज चोप्राबरोबरच पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर शर्यतीत हिंदुस्थानी धावपटूंकडून पदकाची आशा आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या रिले संघाने पाचवे स्थान मिळविले होते. आशियाई स्पर्धेत तर या रिले संघाने निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत धावलेला राजेश रमेश संघात परतला आहे. हिंदुस्थानी रिले संघाने फायनल गाठली, तरी ही देशासाठी मोठी उपलब्धी असेल.
साबळे, पारुल यांच्या कामगिरीवर नजरा
मराठमोळय़ा अविनाश साबळेने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेज प्रकारात 8 मिनिटे 9.91 सेपंद वेळेसह नवा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. जागतिक क्रमवारीत तो 13 व्या स्थानी आहे. साबळेने अंतिम फेरी गाठली तर मोठी कामगिरी असेल. उत्तर प्रदेशची पारुल चौधरी तीन हजार मीटर स्टीपलचेज व पाच हजार मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे. तिच्याकडूनही स्टीपलचेज प्रकारात अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासाची अपेक्षा आहे.
महिला अॅथलीटही करणार दमदार कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यंदा हिंदुस्थानी महिला अॅथलीट दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने फायनल गाठली होती, पण तिला पदकापर्यंत पोहोचता आले नव्हते. यावेळी भालाफेकपटू अन्नू रानी, चालण्याच्या शर्यतीतील पारुल व प्रियंका आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत महिला संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.