Paris Olympics 2024 : मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेनं इतिहास रचला; हिंदुस्थानला तिसरं पदक मिळवून दिलं

कोल्हापूरच्या मातीत जन्माला आलेल्या मराठमोळ्या स्वप्निल कुसाळाने पॅरीसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये स्वप्निलने कांस्यपदकावर निशाणा साधत हिंदुस्थानला तिसरे पदक जिंकून दिले.

स्वप्निल कुसाळे याने 451.4 गुणांची कमाई करत कांस्यपदक जिंकले. चीनच्या खेळाडूने 463.6 गुणांसह सुवर्ण, तर युक्रेनच्या खेळाडूने 461.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले. दरम्यान, दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्निल महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

तिन्ही पदकं नेमबाजीत

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत हिंदुस्थानने तीन पदकं जिंकली आहेत. तिन्ही कांस्यपदकं आहेत. विशेष म्हणजे नेमबाजी स्पर्धेतच ही पदकं मिळालेली आहेत. याआधी 22 वर्षीय मनू भाकर हिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर तिने सरबज्योत सिंगसोबत मिळून 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरी प्रकारात रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. नेमबाजीत एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू पहिली खेळाडू ठरली.

कोण आहे स्वप्निल कुसाळे?

स्वप्निल कुसाळे हा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील रहिवासी आहे. त्याचा जन्म 6 ऑगस्ट 1995 रोजी झालेला आहे. 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक जिंकले, तेव्हापासून त्याला नेमबाजीत कारकिर्द घडविण्याचे वेध लागले.

Paris Olympics 2024 : विजयाचा उन्माद नडला; खेळाडूचा खांदाच निखळला; ‘अशी’ झाली अवस्था

मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत

2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी वडिलांनी त्याला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथून त्याचा प्रवास सुरू झाला. नेमबाजीतील कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी त्याने नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. मधल्या काळात त्याला रेल्वेमध्ये नोकरीही लागली. मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून तो काम करतो. धोनीच्या व्यक्तिमत्वाने आपण प्रभावित झाल्याचे तो सांगतो.