ऑलिम्पिकच्या क्रीडा महोत्सवासाठी 206 देशांचे 10,500 खेळाडू पॅरिसच्या स्वारीवर आले आहेत. या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक विक्रम मोडले जातील, अनेक नवीन खेळाडू रातोरात स्टार होतील. मात्र काही खेळाडू इतके महान आहेत की, त्यांचा नुसता ऑलिम्पिकमधील सहभाग म्हणजे पदकाची हमी असे मानले जाते. स्वीडनचा आर्मंड मोंडो, अमेरिकेची सिमोन बाइल्स, केनियाचा किपचोगे, अमेरिकेची पॅटी लेडेकी असे अनेक हुकमाचे एक्के पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकाचे दावेदार आहेत. याचबरोबर हिंदुस्थानचा रोहन बोपन्ना, अमेरिकेचा स्टार बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स, जमैकाची धावपटू शैली एन फ्रेजर प्राइज व स्पेनचा ‘टेनिस स्टार’ रफाएल नदाल यांचे हे अखेरचे ऑलिम्पिक असणार आहे.
जगावेगळी शैली
जमैकाची तीन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन व आठ वेळची पदकविजेती शैली एन. फ्रेझर प्राइज ही वयाच्या 37 व्या वर्षीही ऑलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती 100 मीटर शर्यतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. 200 मीटर शर्यतीतील तिचा सहभाग संदिग्ध आहे. आपल्या अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी ती कुठलीच कसर सोडणार नाही. बीजिंगपासून सुरू केलेल्या ऑलिम्पिकच्या प्रवासात शैली प्राइजने आतापर्यंत 3 सुवर्ण, 4 रौप्य व एका कास्य पदकाची कमाई केलेली आहे.
शकारी ऑलिम्पिक पदकासाठी आतूर
अमेरिकेची 100 व 200 मीटर शर्यतीतील 24 वर्षीय महिला धावपटू शकारी रिचर्ड्सन गतवेळी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती, मात्र डोपिंग टेस्टमध्ये सापडल्याने तिला संघातून हटविण्यात आले होते. गतवर्षी बुडापेस्टमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेती शकारी आता ऑलिम्पिक पदकासाठी आतूर झाली आहे. बुडापेस्टमध्ये शकारीने 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले होते.
‘दस का दम’वाली लेडेकी
अमेरिकेची 27 वर्षीय जलतरणपटू कॅटी लेडेकी हिने मागील तीन ऑलिम्पिकमध्ये एकूण दहा पदकांची लयलूट केलेली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदकांचा ‘दस का दम’ दाखविणारी पॅटी लेडेकी हिला आता 11 व्या ऑलिम्पिक पदकाचे वेध लागले आहेत. तिचे हे चौथे ऑलिम्पिक होय. पॅटी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 200, 400, 800 व 1500 मीटर फ्री स्टाईल प्रकारात पदकासाठी झुंजणार आहे.
स्टार जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स
अमेरिकेची 27 वर्षीय जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये मानसिकदृष्टय़ा ठीक नसल्यामुळे केवळ बॅलेन्स बीम स्पर्धेतच सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिला कास्यपदकावर समाधान मानावे लागले होते. सांघिक स्पर्धेतही देशाला रौप्यपदक जिंकून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. रियो ऑलिम्पिकमध्ये तिने चार सुवर्णांसह पाच पदके जिंकली होती. गतवर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकून तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही धुमाकूळ घालण्याचे संकेत दिले आहेत.