मोरोक्कोचा अर्जेंटिनावर विजयी ‘वार’; फुटबॉल स्पर्धेला वादाची पेनल्टी

ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळा उद्या असला तरी फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभीच वादाची ठिणगी पडली. मोरोक्को आणि अर्जेंटिना यांच्यातील लढतीत शेवटच्या क्षणी खिस्तियन मेदिनाने गोल ठोकत अर्जेंटिनाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली आणि तेव्हाच मोरोक्कोच्या चाहत्यांनी मैदानात घुसखोरी करून गोंधळ घातला. आधी हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटलेला दिसत होता. पण सामना संपल्यानंतर दोन तासांनी मेदिनाने केलेला गोल वारच्या मदतीने (व्हिडीओ असिस्टंट रेफ्री) रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे जगज्जेत्या अर्जेंटिनाला आपल्या सलामीच्याच सामन्यात खळबळजनक पराभवाला सामोरे जावे लागले.

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनापूर्वीचा दिवस चांगलाच गाजला. मोरोक्कोच्या रहिमी सुफियानने 45 आणि 49 व्या मिनीटाला गोल करत मोरोक्कोला 2-0 अशी जबरदस्त आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर 68 व्या मिनिटाला सायमन ज्युलिआनोने अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. मोरोक्को विजयपथावर असताना मेदिनाने इंज्युरी टाइममध्ये गोल करत अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. हा गोल वादग्रस्त होता. त्यामुळे मोरोक्कोचे चाहते मैदानात उतरले आणि त्यांनी सामनाच थांबवला. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे रेफ्रीने सामनाच थांबवला आणि वारच्या मदतीने मेदिनाच्या गोलची समीक्षा केली. तब्बल दोन तासांनंतर मेदिनाचा गोल ऑफसाईड जाहीर करण्यात आला. त्यामुळे 3 मिनिटे 15 सेपंदासाठी दोन्ही संघ पुन्हा मैदानात उतरले. रिकाम्या स्टेडियमच्या साक्षीने खेळल्या गेलेल्या सामन्यात मोरोक्कोने 2-1 ने बाजी मारली.

स्पेनचा विजयी प्रारंभ
युरो कप विजेत्या स्पेनने आपल्या पहिल्याच सामन्यात उझबेकिस्तानचा 2-1ने पराभव करत विजय सलामी दिली. या सामन्यात स्पेनसाठी मार्प प्युबिलने पहिला गोल केला, तर उझबेकिस्तानच्या एल्डर शोमुरोदोव्हने पेनल्टीवर गोल ठोकत बरोबरी साधली. मात्र 62 व्या मिनिटाला सर्गियो गोमेजने स्पेनला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्याचा हाच गोल निर्णायक ठरला.