Paris Olympics 2024 – पुन्हा मनू हिचाच दिनु

>> मंगेश वरवडेकर

रविवार ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर सोमवारी निराशेचे पदक पदरी पडले. काहीच अपेक्षित घडलं नव्हतं. त्यामुळे सारेच हिरमुसले. तेव्हा ‘जो हुआ वह अच्छा हुआ’ असे मानत आज पुन्हा आपले वीर मैदानात उतरले आणि त्यांनी मैदान मारले. नेमबाजीत जिंकलो, तिरंदाजीत जिंकलो. हॉकीत लौकिकास साजेशा खेळ केला. बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्येही जोरदार सुरुवात केली. साऱया गोष्टी आनंदाच्या आणि जल्लोषाच्या असल्या तरी आजचा दिवसही मनुचाच होता. रविवारी तिने जो क्षण आम्हा हिंदुस्थानींना दिला होता, त्याचीच मंगळवारी पुन्हा प्रचीती आली. तिच्या आजच्या कामगिरीसाठीही तोंडात शब्दच नव्हते. तिची कामगिरी अद्वितीय होती. तोंडात बोटं घालावीत, अभिमानाने छाती फुगावी अशीच होती. तिच्या यशात सरबज्योत सिंगचाही सिंहाचाच वाटा होता. कारण 10 मीटर एअर पिस्टलच्या मिश्र दुहेरीत सरबज्योतच्या कामगिरीनेच पुन्हा एकदा पदकाची ज्योत पेटवली.

आम्ही हिंदुस्थानी एखाद्या यशाने हुरळून जातो आणि एखाद्या अपयशाने निराशही होतो. पण आता आपल्याला बदलायला हवं. आपले सारे खेळाडू पदकांसाठी खेळताहेत. आपण ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो, ते कधी-कधी अपेक्षांवर खरे उतरत नाहीत. फार दुःख होतं. ते साहजिकच आहे. रोहन बोपण्णाकडून हमखास पदकाची अपेक्षा होती. तिरंदाजीत दीपिका पुमारी असो किंवा प्रवीण जाधव, साऱयांनी पदकाची आशा पल्लवित केली होती. ते लढण्याआधीच हरतात तेव्हा हिंदुस्थानी मनाला राग येतो आणि येणारच. ऑलिम्पिकमध्ये सर्वांचे एकच ध्येय असते. ते म्हणजे पदक. आता आपलेही वीर पदकांसाठीच उतरले आहेत. त्यामुळे न लढता हरणं हे पटणारच नाही.

एकीकडे हिंदुस्थानच्या काही दिग्गजांना अपयश आले असले तरी मनुने आजचाही दिवस संस्मरणीय केलाय. तीन दिवसांत दुसरे पदक जिंपून तिने अद्वितीय कामगिरी केलीय, अद्वितीय इतिहास रचलाय. आता आपली पावले योग्य दिशेने पडू लागलीत. जे गेल्या शंभर वर्षांत कधी घडलं नव्हतं ते आता घडलंय. एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा हिंदुस्थानी खेळाडूचा महापराक्रम मनुच्या नावावर कोरला गेला आहे. आज ऑलिम्पिकचा चौथा दिवस आहे. अजून 12 दिवस उरलेत. आपल्या दिग्गजांनी अर्जुनासारखे पदक हेच लक्ष्य ठेवले तर आपल्याला दररोज आनंदाची, पराक्रमाची, विक्रमाची संस्मरणीय बातमी मिळत राहील. ही अतिशयोक्ती नव्हे. जे टोकियोत घडले, ते ओलांडणे हे आपल्या खेळाडूंचे परमकर्तव्य आहे.

क्रीडा विश्वात आपल्याला सारेच मागासलेले म्हणून पाहतात आणि संबोधतात. आपल्या शहरांएवढी लोकसंख्या असलेले देशही आपल्या कैकपटीने पुढे आहेत आणि आपला 140 कोटींचा देश. असो, खेळात लोकसंख्येचा नव्हे तर जिगरबाजवृत्तीला सलाम ठोकला जातो. उशिरा का होईना आता आपले खेळाडू जिगरबाज आहेत, धडाकेबाज आहेत. मनुच्या दुहेरी यशाने एव्हाना साऱयांनाच स्फूर्ती मिळाली असेल. त्यांनीही आता पेटून उठावे आणि आपल्या ऑलिम्पिक यशाची ज्योत पुढील अकरा दिवस पेटत ठेवावी. तो क्षण आता आलाय. कारणं नकोय. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ समजून उतरा मैदानात. बदला इतिहास.