Paris Olympics 2024 – मनिका बत्राची ऐतिहासिक घोडदौड

हिंदुस्थानचे आशास्थान असलेल्या मनिका बत्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यजमान फ्रान्सच्या पृथिका पावाडे हिचा महिला एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत पराभव करीत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ऑलिम्पिकच्या इतिहासात उपउपांत्यपूर्व फेरी गाठणारी मनिका ही पहिलीच हिंदुस्थानी खेळाडू ठरल्याने हा विजय तिच्यासाठी ऐतिहासिकच ठरलाय.

जागतिक क्रमवारीत 28 वे मानांकन असलेल्या मनिका बत्राने 8 व्या मानांकित पृथिका पावाडे हिचा 4-0 (11-9, 11-6, 11-9, 11-7) असा धुव्वा उडवून ऑलिम्पिकमधील आपली घोडदौड सुरूच ठेवली. 37 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत मनिकाला डावखुऱया पृथिकाविरुद्ध ताळमेळ जुळण्यास थोडा वेळ लागला. त्यामुळे पहिला गेम चुरशीचा झाला, पण अखेरचे तीन गुण मिळवित मनिकाने हा गेम जिंकला. दुसऱया गेममध्ये 6-6 अशा बरोबरीनंतर मनिकाने प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढू दिले नाही. तिसऱया गेममध्ये मनिकाने एक वेळ पाच गुणांची आघाडी घेतली होती, मात्र पृथिकानेही सलग चार गुणांची कमाई करीत 9-10 असे अंतर कमी करून गेममध्ये चुरस निर्माण केली होती, मात्र तरीही पृथिकाला हा गेमही जिंकता आला नाही. चौथ्या गेममध्ये मनिकाने सहज बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केला. यावेळी मनिका बत्राकडून तमाम देशवासीयांना पदकाची अपेक्षा आहे.