Paris Olympics 2024 – लक्ष्य सेनचा शानदार विजय

हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने दुसऱ्या बेल्जियमच्या ज्युलियन पॅराग्गीचा 21-19, 21-14 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या अभियानाचा विजयारंभ केला.

लक्ष्यचा ऑलिम्पिकमधील हा पहिलाच अधिकृत सामना होय. कारण त्याचा सलामीचा सामना हा गृहित धरला जाणार नसल्याचे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्लूएफ) स्पष्ट केले आहे. लक्ष्य सेनने 43 मिनिटांत हा सामना जिंकला. मात्र, ज्युलियनने पहिल्या गेममध्ये लक्ष्यचा चांगलाच घामटा काढला. चुरशीच्या या गेममध्ये लक्ष्य सेनने पुनरागमन करीत बाजी मारली. मात्र, दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढण्याची फारशी संधी दिली नाही.

लक्ष्य सेनचा पहिला विजय रेकॉर्डवरून हटवला

लक्ष्य सेनने गटफेरीतील पहिल्या सामन्यात केविन कॉर्डनचा पराभव केला होता. मात्र, हा सामना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने रेकॉर्डवरून हटवला आहे. त्यामुळे या सामन्याचे गुण आता गृहित धरले जाणार नाहीत. रविवारी सायंकाळी या निर्णयाची माहिती देण्यात आली. लढतीदरम्यान केविन कॉर्डन हा डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्वाटेमालाचा बॅडमिंटनपटू केविन कॉर्डनने डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्लूएफ) एका अपडेटमध्ये म्हटले आहे.