आधी जगभरातील मोठय़ा खेळाडूंना पाहून आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास डळमळायचा. काहींचे हातही थरथरायचे. त्यामुळे आपल्यासाठी पदक जिंकणेही एव्हरेस्ट गाठण्यासारखे वाटायचे. पण आता आपल्या खेळाडूंनी आत्मविश्वासाचे एव्हरेस्ट गाठलेय. त्यामुळे आता आपल्याला पदकांची नव्हे तर सोन्याची स्वप्न पडू लागतील, असा अभिमान हिंदुस्थानचा आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि ‘शेफ दी मिशन’ गगन नारंगने बोलून दाखवला.
आज पॅरिसच्या क्रीडानगरीत नेमबाजीच्या पथकाबरोबर दाखल झालेल्या गगन नारंगचा आनंद आणि आत्मविश्वास गगनात मावेनासा झाला होता. त्याने पत्रकारांशी हसत खेळत संवाद साधत आपल्या भावना मनमोकळय़ापणे व्यक्त केल्या. तो म्हणाला, हिंदुस्थानी खेळाडूंना प्रोत्साहन द्या. त्यांच्याबद्दल नकारात्मक काही लिहू नका. आता आपले खेळाडू आपल्या देशाला वेगळय़ा उंचीवर घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेत. खेळाडूंचा आत्मविश्वास पाहून माझे मनोधैर्य उंचावले आहे. काही वर्षांपूर्वी दिग्गज देशांपुढे आपले खेळाडू दम सोडायचे. त्यांचे नाव ऐपून त्यांचे मनोधैर्य खचायचे, पण आता सारे काही बदललेय. खरं सांगायचं तर हिंदुस्थानी खेळाडू आता पुणाला घाबरणारे राहिले नाहीत. खेळ आणि मानसिकता या दोन्ही गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे निव्वळ पदकांसाठी ऑलिम्पिकला पात्र ठरणारे आपले खेळाडूंना आता सुवर्ण पदकाची स्वप्ने पडू लागलीत. आपल्या अव्वल खेळाडूंचे आता हेच ध्येय आहे. बदललेली मानसिकताच हिंदुस्थानच्या क्रीडा जगताला ऑलिम्पिकमध्ये मानाचे स्थान मिळवून देईल, असा विश्वासही गगन नारंग यांनी व्यक्त केला.
उशिरा का होईना आपल्या खेळाडूंना आता आपण पुठे कमी आहोत याची जाणीव होत नाही. ते पुणालाही भिडायला तयार असतात. आधी असे जराही नव्हते, पण पेंद्र सरकारने कधी नव्हे इतके सर्वतोपरी पाठबळ हिंदुस्थानी खेळाडूंच्या पाठीशी उभे केल्यामुळे वेगळीच ऊर्जा लाभल्याचेही गगनने सांगितले. चार ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता ‘शेफ दी मिशन’ची जबाबदारी मिळाल्यानेही आपण आनंदित असल्याचे त्याने सांगितले.