विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धेतील काही विश्वविक्रम मोडणे जरा कठीणच गोष्ट वाटते. शुक्रवारपासून (दि.26) पॅरिस ऑलिम्पिकच्या क्रीडा महोत्सवाचा शंखनाद होणार आहे. फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा होत असलेल्या यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये किती नवीन विक्रम होणार, याकडे तमाम क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकमधील दहा विक्रमांवर एक नजर टाकूया.
व्हेनेझुएलाच्या युलिमार रोजास हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (2020) महिलांच्या तिहेरी उडीत 15.67 मीटर उडी मारून ऑलिम्पिक विक्रम केला. तिने त्याआधीच्या रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये युलिमारने तीन दशके अबाधित असलेला विक्रम मोडीत काढत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
800 मीटर शर्यतीतील विक्रम
लंडन ऑलिम्पिकमध्ये (2012) केनियाचा मध्यम पल्ल्याचा धावपटू डेव्हिड रूडिशा याने पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत 1 मिनीट 40.91 सेपंद वेळेसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला. हा विक्रम आजपर्यंत अबाधित आहे.
200 मीटर शर्यतीतील विक्रम
अमेरिकेच्या फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर उर्फ फ्लो-जो याने 1988 मध्ये सियोल ऑलिम्पिकमध्ये 200 मीटर शर्यतीत 21.34 सेपंद वेळेसह विश्वविक्रम प्रस्थापित केला. तो विश्वविक्रम आजपर्यंत कोणालाही मोडता आलेला नाहीये.
बटरफ्लायमधील वर्ल्ड रेकॉर्ड
अमेरिकन जलतरणपटू पॅलेब ड्रेसेल याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (2020) पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत 49.45 सेपंद वेळ नोंदवित नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याने आधीचा विक्रम 0.05 सेपंदाच्या फरकाने मोडला.
8.90 मीटर विक्रमी उडी
अमेरिकेला लांब उडीतील खेळाडू बॉब बीमॉन याने 1968च्या मॅक्सिको ऑलिम्पिकमध्ये 8.90 मीटर (29.2 फूट) उडी मारून वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याने या ऑलिम्पिकमध्ये केवळ सुवर्णपदक नाही जिंकले, तर आधीच्या विक्रमापेक्षा दोन फूट अधिक लांब उडी मारली. बीमॉनच्या या विक्रमाच्या आसपासदेखील आजपर्यंत कोणाला पोहोचता आले नाही, हे विशेष.
मायकल फेल्प्सचा डंका
अमेरिकेचा जलतरणपटू मायकल फेल्प्स हा ऑलिम्पिकच्या इतिहासातील एक महान खेळाडू होय. त्याने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. तो एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकणारा ठरला. या ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्णपदके जिंकून फेल्प्सने वर्ल्ड रेकॉर्ड केला. शिवाय ही आठ सुवर्णपदके जिंकताना त्याने तब्बल सात विक्रम मोडीत काढले, हे विशेष.
रिलेत जमैकाचा विक्रम
2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये जमैका संघाने 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत 36.84 सेपंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. या रिले संघात उसेन बोल्टचाही समावेश होता. त्यांचा हा विक्रम आजही कायम आहे.
उसेन बोल्टचा जलवा
भूतलावरील सर्वात वेगवान धावपटू अशी उपाधी मिळालेला जमैकाचा उसेन बोल्ट सर्वकालीन महान खेळाडूंच्या पंगतीतील खेळाडू होय. त्याने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यतीत 9.69 सेपंद वेळेसह नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. बोल्ट या शर्यतीत इतका पुढे गेला होता, की फिनिशिंग लाईन पार करण्यापूर्वीच त्याने जल्लोषास सुरुवात केली होती.
400 मीटर अडथळा शर्यतीतील विक्रम
नॉर्वेचा वेगवान धावपटू कार्स्टन वारहोम याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत 45.64 सेपंद वेळेसह जागतिक विक्रम केला. त्याची ही कामगिरी मागील 18 स्पर्धांपेक्षा सरस ठरली, हे विशेष.