Paris Olympic : ऑलिम्पिकच्या ‘सुवर्ण’ पदकांमध्ये लोखंड, जगप्रसिद्ध आयफेल टॉवरशी खास कनेक्शन

खेळाचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यंदा फ्रान्समधील पॅरिस शहरामध्ये आयोजन करण्यात आले आहे. जगभरातून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे लक्ष सुवर्णपदकावर असते. या स्पर्धेत एकदा तरी सुवर्णपदक जिंकून इतिहासात नाव कोरण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूची असते. ऑलिम्पिकमध्ये पहिल्या तीन विजयी खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक देऊन गौरविण्यात येते. अर्थात अनेकांना वाटते की खेळाडूंना मिळणारे सुवर्णपदक हे पूर्णपणे सोन्याचे असते. मात्र यामागील सत्य वेगळेच आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खासप्रकारे पदक तयार करण्यात आले आहे.

यंदा ऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूला 529 ग्रॅम वजनाचे सुवर्ण पदक दिले जाणार आहे. या सुवर्ण पदकाचा जवळपास 95.4 (505 ग्रॅम) टक्के हा भाग चांदीपासून बनलेला आहे. यात फक्त 6 टक्के शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या पदकाणध्ये 18 ग्रॅम लोखंडाचाही वापर करण्यात आला आहे. या पदकाची किंमत 950 डॉलर (80 हजार रुपये) आहे.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, जर विजेत्यांना देण्यात येणारे पदक शुद्ध सोन्याचे असते तर त्याचा बाजारभाव 41,161.50 डॉलर (जवळपास 34.46 लाख रुपये) असता. 1912 मध्ये असे शुद्ध सोन्याचे पदक अखेरचे देण्यात आले होते.

दरम्यान, सेंट ल्युईसमध्ये 1904 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकपासून विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकं देण्यात आली आणि पुढे ही परंपरा आजतागायत सुरू आहे. अर्थात या पदकांचा आकार, वजन आणि रजनेमध्येही वेळोवेळी बदल झालेले आहेत. ऑलिम्पिकचे आयोजन करणारे देश आपापल्या पद्धतीने यात बदल करतात. यावेळीही फ्रान्सने पदकामध्ये बदल केला आहे.

Paris Olympics 2024 – ध्वज विजयाचा उंच धरा रे… जगभरातील 10500 क्रीडावीर पदकांच्या संघर्षासाठी सज्ज

पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकची पदकं षटकोनी आकाराची असून यात जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या मूळ लोखंडाचा तुकडा बसवण्यात आलेले आहे. हे तुकडे आयफेल टॉवरच्या नुतनीकरणादरम्यान काढण्यात आले होते. पदकांच्या मध्यभागी हे तुकडे बसवण्यात आलेले आहेत.

दरम्यान, रौप्य पदकाचे वजन 525 ग्रॅम असून यात 507 ग्रॅम चांदी, तर 18 ग्रॅम लोखंड वापरण्यात आलेले आहे. याचा बाजारभाव 486 डॉलर (जवळपास 41 हजार रुपये) आहे. तर कांस्य पदकाचे वजन 455 ग्रॅम आहे. यात 415.15 ग्रॅम तांबे, 21.85 ग्रॅम झिंक आणि 18 ग्रॅम लोखंड वापरण्यात आले आहे. याचा बाजारभाव 13 डॉलर (जवळपास 1100 रुपये) आहे.