Paris Olympics 2024 – हिंदुस्थानला आणखी एका पदकाची आशा, बॉक्सर लवलिनाची क्वार्टर फायनलमध्ये धडक

हिंदुस्थानची महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 75 किलो वजनी गटामध्ये लवलिनाने आज (31 जुलै) नॉर्वेच्या बॉक्सर सनीवा हॉफस्डेडला सहज पराभूत केले. लवलिनाच्या या विजयामुळे तिचा क्वार्टर फायनलमध्ये दणक्यात प्रवेश झाला आहे.

पहिल्या राऊंड पासून लवलिनाने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड निर्माण केली होती. पहिले दोन्ही राऊंड लवलिनाने 5-0 अशा फरकाने सहज जिंकले. लवलिनाच्या आक्रमक खेळापुढे सनीवाचा निभाव लागला नाही. सामन्याच्या तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा लवलिनाने आपली आक्रमकता कायम ठेवली आणि 5-0 या फरकाने तिसरा राऊंड जिंकत सामनासुद्धा खिशात घातला. या विजयासहीत लवलिनाने उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे. लवलिनाचा क्वार्टर फायनलमध्ये सामना चीनच्या बॉक्सर ली कियानविरुद्ध होणार आहे.

लवलिना बोर्गोहेन चा इतिहास पाहिला तर तीने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. विजेंदर सिंह आणि एमसी मेरिकॉम यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी लवलिना तिसरी बॉक्सर आहे. लवलिनाने 75 किलो वजनी गटात 2022 मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये आणि 2023 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनचा किताब पटकावला आहे. त्याचबरोबर 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रिडी स्पर्धेत लवलिनाने रौप्य पदक जिंकले होते. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये लवलिनाकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.