तिरंदाजीत पदकाविना आव्हान संपुष्टात! भजन कौरपाठोपाठ दीपिकाचाही बाण भरकटला

आज तिरंदाजीचा बाण हिंदुस्थानी क्रीडाप्रेमींच्या हृदयातच घुसला. नेमबाजीपाठोपाठ तिरंदाजीत पदकाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र भजन कौर शूट ऑफमध्ये हरली, तर दीपिका कुमारी 4-2 ने आघाडीवर असतानाही पिछाडीवर पडली आणि शेवटच्या सेटमध्ये कोरियाच्या नाम सुहयानने 29 गुण मिळवत आपली उपांत्य फेरी निश्चित केली. दीपिकाच्या पराभवामुळे यंदाही हिंदुस्थानचे तिरंदाजीचे ऑलिम्पिक आव्हान पदकाविनाच संपुष्टात आले.

नेमबाजीत तीन पदके कमावल्यानंतर हिंदुस्थानच्या तिरंदाजांनीही लक्षवेधी कामगिरी करत पदकाच्या दिशेने धाव घेतली होती. हिंदुस्थानसाठी सातत्याने ऑलम्पिकवारी करणाऱया दीपिकाला आपले पदकाचे स्वप्न साकारण्याची संधी होती. तिने आधी जर्मनीच्या मिशेल क्रोपेनचा थरारक लढतीत 6-4 असा पराभव केला. ही लढत 5-5 अशा बरोबरीत सुटणार होती, फक्त क्रोपेनला शेवटच्या शॉटवर 10 गुण मिळवायचे होते, पण ती 9 गुणच मिळवू शकली आणि पाचवा सेट 27-27 असा बरोबरीत सुटला आणि दोघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळाला. दीपिकाने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली.

आज दीपिकाला उपांत्यपूर्व फेरीत बाणाने इतिहास रचण्याचा पराक्रम होता, पण ती शेवटच्या क्षणी दबावाला नियंत्रित करू शकली नाही. दीपिकाने पहिल्या तीनपैकी दोन सेट जिंकत 4-2 अशी आघाडी घेतली होती. चौथा सेट जिंकून तिला सामना जिंकण्याचीही संधी होती, पण शॉट मारण्यासाठी शेवटच्या सेपंदापर्यंत वेळ घेणाऱया दीपिकाने सात गुणांचा बाण मारून निराशा केली आणि याचा लाभ उचलत नामने 29-27 असा सेट जिंकत बरोबरी साधली. पाचवा आणि शेवटचा सेट निर्णायक होता. नामने पहिल्या शॉटवर परफेक्ट टेनचा बाण मारला आणि त्यानंतर दीपिकाला 9 पेक्षा अधिक गुण मिळवता आले नाही. सामना 19-18 अशा स्थितीत असताना नामने आणखी एक परफेक्ट टेन मारत उपांत्य फेरीवर आपले नाव कोरले. दीपिकाने तेव्हाच सामना गमावला होता. तिने 9 गुण मिळवले, पण नामने सामना 29-27 असा जिंकला.

शूट ऑफमध्ये भजन बाद

आज भजन कौर उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठीच उतरली होती. इंडोनेशियन दियायांदा कोइरूनिसाविरुद्ध तिची चांगलीच चकमक उडाली. पहिला सेट 28-29 असा गमावल्यानंतर भजनने दुसरा सेट 27-25 असा जिंकला. मात्र तिसऱया सेटमध्ये पुन्हा कोइरुनिसाने 28-26 अशी आघाडी घेतली. चौथा सेट 28-28 असा बरोबरी सुटला आणि पाचव्या सेटमध्ये भजनने 27-26 अशी बाजी मारत 5-5 अशी बरोबरी साधली. मग शूट ऑफमध्ये कोइरूनिसाने 9 गुण मिळवले तर भजनला आठच गुण मिळवता आले आणि हा भजनचा प्रवास उपउपांत्यपूर्व फेरीतच संपला.