Paris Olympics 2024 – विनेशवरचं विघ्न!

>>द्वारकानाथ संझगिरी

विनेश फोगाटबद्दल काय लिहावं, हेच मला उमगत नाही.

ती स्पर्धेतून बाद होणं ही दुर्दैवाची परिसीमा आहे. जे घडलंय ते सर्व बारीक तपशिलांसह तुमच्यासमोर आहे.

‘यू टू ब्रूटस’ असे विनेशला नियतीला म्हणावंसं वाटलं असेल. कारण ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी नियती तिची जिवलग मैत्रीण झाल्यासारखी वाटली.

सकाळी 49.8 किलो वजन, मग अशा जपानी खेळाडूला हरवणं की, जी त्याआधी 82 वेळा कोणाशी हरलीच नव्हती. त्यानंतर आणखीन दोन विजय. अवघ्या तीन पावलात ती सुवर्णपदकाच्या जवळ येऊन उभी होती. सुवर्णपदकाच्या लढतीत जी अमेरिकन खेळाडू तिच्यासमोर होती. तिला विनेशने आधी दोन-तीनदा हरवलं होतं. म्हणजे सुवर्णपदक जिंकण्याची तिची आशा चांगलीच मोठी होती. तो दिवस मावळला आणि दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले ते थेट डिस क्वॉलिफिकेशननंतर संपले. केवळ 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे ती स्पर्धेबाहेर पूर्णपणे फेकली गेली. इतक्या दूर की सुवर्णपदकाच्या इतक्या जवळ येऊनसुद्धा कांस्यपदकसुद्धा तिला मिळणार नव्हतं. नियमच तसा आहे आणि ऑलिम्पिकमध्ये नियम बदलत नाही.

एपंदरीत तिच्या नशिबाचा खेळ पाहिल्यावर मला माझं लाडपं महाभारत आठवतं आणि त्यातल्या काही व्यक्तिरेखा.

तिचं नशीब हे कर्णाच्या नशिबासारखं होतं. कर्ण  क्षत्रिय असून त्याला जगाने आयुष्यभर सुतपुत्र म्हणून हिणवलं. द्रौपदीच्या स्वयंवरात तो पण जिंकायची पुवत असून केवळ सुतपुत्र म्हणून द्रौपदीने त्याला नाकारला. ज्या अर्जुनाबरोबर त्याने शेवटपर्यंत स्पर्धा केली. त्याच्याशी निकराची लढाई लढताना त्याच्या रथाचे चाक चिखलात रुतलं. विनेश फोगाटच दुसरं काय झालं? विनेश सुवर्णपदकापासून फक्त एका पावलावर असताना दैवाने तिच्या शरीरात फक्त शंभर ग्रॅम अधिक ठेवले. शंभर ग्रॅम म्हणजे किती झाले? अर्धा कप पाणी किंवा दोन मोठी अंडी. तेवढय़ा वजनाने तिचा घात झाला.

तिची लढाई ही फक्त गोल्ड मेडलसाठी नव्हती.

त्या पलीकडे जाऊन तिला काहीतरी सिद्ध करायचं होतं. राष्ट्रीय पुस्ती संघटनेमधल्या दुर्योधन दुष्यासनाला तिला धडा शिकवायचा होता. निदान प्रतिउत्तर द्यायचं होतं. आणि त्यासाठी हेच स्टेज आणि सुवर्णपदक हे उत्तर होतं. दुष्यासनाच्या रक्ताने केस बांधणाऱ्या द्रौपद्रीसारखी सुडाची भावना तिच्या मनात असावी. ती जंतरमंतरचे दिवस विसरली नसावी. तिलाही केसाला धरून ओढलं गेलं होतं; पण हे सगळं त्या 100 ग्रॅम अधिक वजनाने मातीमोल करून  टाकलं.

काही मंडळींनी कटाची शंका बोलून दाखवली आहे.

मला स्वतःला लॉजिकली असं काही घडलं असावं, हे या क्षणी तरी नक्की वाटत नाही. कारण दुरान्वयानेही तसा पुरावा कोणी दिलेला नाही. बरं तिच्याबरोबर जी माणसं होती ती सर्व तिने निवडलेली होती. ती पुस्ती संघटनेने निवडलेली नव्हती. तिथे तिचा नवरा होता. तिचा आहारतज्ञ होता. तिचा कोच होता. तिचा ट्रेनर होता आणि आपल्या चमूचा डॉक्टर होता. या सर्वांनी मिळून तिचं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. कदाचित खाण्याचं गणित आणि त्या तुलनेत वजन कमी करण्याचे अफाट प्रयत्न यांचं गणित सुटू शकलं नाही. आणि तेच चुकलं असण्याची शक्यता आहे. ते कोणी जाणूनबुजून चुकवलं असावं, असं मला वाटत नाही आणि असं तिलाही वाटत नसावं. कारण नाहीतर तिने तसं बोलून दाखवलं असतं. तिने पुठलीही शंका व्यक्त केली नाही. ना तिने कोणाला दोष दिला. आपण म्हणतो ‘दैव देते आणि कर्म नेते’ इथे तिच्या अथक कर्माने तिला दिलं होतं आणि दैव ते घेऊन गेलं. आपल्याकडे चालणारा ‘जुगाड’ तिथे चालत नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तसं होऊ शकत नाही.

नियम म्हणजे नियम व तो सर्वांसाठी असतो.  कदाचित जो नियम आहे, तो तसा अन्याय करणारा आहे. कारण ज्या वेळेला खेळाडू लढत असतो, त्या वेळेला त्याची होणारी झीज भरून काढावीच लागते. त्यामुळे वजन आणि खाणं यांचं गणित निदान दुसऱ्या दिवशी चुपू शकतं. पूर्वी ही स्पर्धा सुवर्णपदकासह एका दिवसात संपायची. कदाचित खेळाडूंना त्याचा त्रास होतो, ते थपून जातात म्हणून दुसरा दिवस ठेवला गेला असावा, पण मग पुन्हा वजन करणे हे थोडंसं अन्यायकारक आहे. कारण आदल्या दिवशी तीन सामने खेळल्यानंतर तेवढेच वजन ठेवणे ही तारेवरची कसरत आहे आणि त्याची सोय नियमात हवी. पण, आजच्या नियमांप्रमाणे ती हरली. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तिला मनापासून 53 किलो वजनाच्या गटामध्ये भाग घ्यायचा होता का? तिला 50 किलो वजनाच्या गटामध्ये ढकललं गेलं का?

कारण तिलाही स्वतःला कल्पना असावी की, वजन एकदम घटवणे ही सोपी गोष्ट नाही. पहिल्या दिवशी ते ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशी तीन-तीन लढाया झाल्यानंतर आणि त्यासुद्धा मोठमोठय़ा खेळाडूंशी हे गणित सांभाळणं विशेषतः ज्यांनी गट बदललाय त्यांच्यासाठी कठीण आहे.

मग आणखीन एक प्रश्न निर्माण होतो की, तिला 53 किलो वजनाचा गट का नाही दिला?

मैदानाबाहेर जेव्हा तिची झुंज सुरू होती त्या वेळेला 53 किलो गटातला ऑलिम्पिक कोटा हा अंतिम पंघाल या खेळाडूला मिळाला. कारण वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिला ब्राँझ मिळालं होतं आणि विनेश दुखापतीमुळे तिथे जाऊ शकली नव्हती. त्यानंतर राष्ट्रीय निवड चाचणीत 53 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत विनेश पराभूत झाली. अशा वेळी तुम्हाला दोन गटांत संधी असते. एक कमी वजनाच्या म्हणजे 50 किलो वजनाच्या गटात किंवा 57 किलो वजनाच्या गटात. तिने 50 किलो वजनाच्या गटाला पसंती दिली आणि राष्ट्रीय निवड चाचणीत तिने बाजी मारली. याचा अर्थ गट निवडण्याच्या बाबतीत काही काळबेरं होतं असं अजून तरी वाटत नाही.

शेवटी अगदी आतल्या गोष्टी या कळणं कठीण असतं. यातून एकच गोष्ट सिद्ध होते की, जे काही झालं ते या क्षणी तरी निव्वळ दुर्दैव वाटतं. घडलेल्या गोष्टीने अख्खा देश हळहळला. कारण मनाने देश तिच्या सुवर्णपदकाकडे पोहोचलासुद्धा होता. सर्वसाधारण माणूस तिच्यावर जो फिदा होता तो तिच्या लढाऊ वृत्तीमुळे आणि त्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचताना तिने जे योद्धे वाटेत लोळवले त्यासाठी. एक फोड न येता ती अंतिम फेरीपर्यंत आगीतून चालत गेली आणि घात केला तो 100 ग्रॅम वजनाने.

ती प्रत्यक्षात हरूनही लोकांच्या मनात जिंकली.

ती हिंदुस्थानात परतल्यावर तिच्यावर बक्षिसांची खैरात होईल. मिरवणूक निघेल, पण तिचं प्रत्यक्ष यश हे बक्षिसात लोकांच्या गर्दीत किंवा पैशांत मोजता येणार  नाही. त्यासाठी सुवर्णपदकाचीच गरज होती. कारण शेवटी काळ लक्षात ठेवतो ते सुवर्णपदक. इतर गोष्टी विसरल्या जातात आणि आता तिने निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे तिचं कार्य संपलं असं नाही. उलट नवीन कार्य सुरू झालं. तिला आणखीन एक विनेश आता तयार करायची आहे, जी तिचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करेल.

हे देशाला पहाटेला पडलेले स्वप्न होतं.

ती स्वप्नं खरी होतात असं म्हणतात, पण तसं झालं नाही.  तिला दृष्ट लागली.