तिरंदाजी अन् नौकायन संघ खेळ गावात दाखल; हिंदुस्थानचे ऑलिम्पिक संघाचे पथकप्रमुख गगन नारंग यांची माहिती

आता खऱ्या अर्थाने पॅरिस ऑलिम्पिकचे काउंटडाउन सुरू झाले आहे. हिंदुस्थानचा पहिला चमू ऑलिम्पिक खेळ गावात दाखल झालाय. हिंदुस्थान ऑलिम्पिक संघाचे पथकप्रमुख गगन नारंग यांनी ही माहिती दिली. तिरंदाजी व नौकायन संघ पॅरिसमध्ये दाखल होणारे हिंदुस्थानचे पहिले संघ ठरले.

पॅरिस ऑलिम्पिकचा धुमधडाका सुरू होण्यासाठी जेमतेम पाच दिवस उरले आहेत. 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचा 117 खेळाडूंचा चमू विविध 20 खेळांमध्ये आपले कौशल्य पणाला लावणार आहे. हिंदुस्थानचा पुरुष हॉकी संघही आज नेदरलॅण्डहून पॅरिसमध्ये दाखल होईल.

लंडन ऑलिम्पिकमधील (2012) कांस्यपदकविजेते नेमबाज गगन नारंग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मी स्वतः गुरुवारी रात्री पॅरिसमध्ये दाखल झालो. ऑलिम्पिक खेळ गावात जाऊन तेथील तयारीची सर्व माहिती घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिरंदाजी अन् नौकायन संघ खेळ गावात दाखल झाला. येथील वातावरणाशी जुळवून घेणे व सर्व माहिती मिळविणे हे काम सध्या खेळाडू करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खेळ गावात दाखल झालेल्या खेळाडूंबद्दल माहिती देताना गगन नारंग म्हणाले, हिंदुस्थानी खेळाडू सध्या उत्साहित दिसत आहेत. ऑलिम्पिक परिसरात सराव करण्यासाठी आपले खेळाडू आतूर झाले आहेत. प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी खेळाडूंना जे काही पाहिजे, ते सर्व मिळायला हवे. हिंदुस्थानी पथकात पदकाचे दावेदार वाढत आहेत, ही नक्कीच पथकप्रमुख म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

मी स्वतः चार ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असल्याने माझी अनुभवाची शिदोरी खेळाडूंसाठी नक्कीच उपयोगी पडेल. हिंदुस्थानी चमूतील प्रत्येक खेळाडू क्रीडाविश्वातील सर्वोत्तम खेळाडूशी फक्त स्पर्धा नव्हे, तर त्याला मागे टाकण्याच्या इर्षेने मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे यावेळेच्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या पदकांचा आकडा दुहेरी झालेला मला बघायचा आहे, असा आशावादही नारंगने व्यक्त केला.