रोहन बोपन्नाला इतिहास घडविण्याची संधी

हिंदुस्थानचा सदाबहार टेनिसपटू लिएंडर पेसला वयाच्या पस्तिशीनंतर मोठे यश मिळायला लागले. आता तो 44 वर्षांचा झालाय. वयाच्या 43 व्या वर्षी मॅथ्यू एबडेनच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपनचे किताब जिंकून तो ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा टेनिस विश्वातील सर्वात वयस्क खेळाडू ठरला. आता त्याचे लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिकवर आहे. कारण यावेळी बोपन्नाला ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचा सर्वात वयस्क पदकविजेता बनून इतिहास घडविण्याची संधी असेल.

रोहन बोपन्ना आपला नेहमीचा साथीदार मॅथ्यू एबडेनच्या ऐवजी आपलाच देशसहकारी एन. श्रीराम बालाजीच्या साथीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झालाय. बोपन्ना-बालाजी जोडीने पदक जिंकल्यास ती बोपन्नासाठी ऐतिहासिक कामगिरी असेल. कारण असे घडल्यास तो ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात वयस्क हिंदुस्थानी खेळाडू ठरणार आहे.

जागतिक क्रमवारीत 62 व्या स्थानी असलेला एन. श्रीराम बालाजी हा रोहन बोपन्नाचा दुहेरीतील नेहमीचा जोडीदार नाहीये. ऑलिम्पिकमध्ये ताळमेळ बसण्यासाठी दोघे एकत्र खेळत आहेत. बोपन्नाने खूप विचार करून बालाजीच्या साथीत दुहेरीची जोडी बनविली. डिसेंबर 2023 मध्ये बोपन्नाने स्वतःच्या खर्चाने काही हिंदुस्थानी टेनिसपटूंनी हॉटेलमध्ये थांबविले होते. त्यात बालाजीचाही समावेश होता. या काळात बोपन्नाने बालाजीबद्दल सर्व माहिती मिळवून त्याला दुहेरीतील आपला जोडीदार बनविण्याचा निर्णय घेतला. बोपन्नाने राष्ट्रीय टेनिस महासंघाला आपल्या या निर्णयाबद्दल कळविले, मात्र टेनिस महासंघाने बालाजीच्या नावाची घोषणा खूप उशिरा केली. ऑलिम्पिकमध्ये क्ले कोर्टवर टेनिसची स्पर्धा होत आहे. बालाजीचा क्ले कोर्टवरील खेळ चांगला असल्यानेच बोपन्नाची ऑलिम्पिकसाठी दुहेरीतील साथीदार म्हणून निवड केली.

रियोमध्ये सानियाच्या साथीत पदकाची हुलकावणी

रोहन बोपन्नाचे कारकीर्दीतील हे तिसरे ऑलिम्पिक होय. 2012 व 2016च्या ऑलिम्पिकपूर्वी साथीदार बनविण्यासाठी बोपन्ना वादग्रस्त ठरला. त्याने लंडन ऑलिम्पिकसाठी लिएंडर पेसऐवजी महेश भूपतीच्या साथीत जोडी बनविली. रियो ऑलिम्पिकमध्येही सानिया मिर्झाने पेसऐवजी बोपन्नाला मिश्र दुहेरीसाठी पसंती दिली. दोन्हीवेळी पदकाचे दावेदार असलेल्या बोपन्नाला पदकाने हुलकावणी दिली. लंडन ऑलिम्पिकमध्ये बोपन्ना-भूपती जोडीचा दुसऱयाच फेरीत पराभव झाला, तर रियो ऑलिम्पिकमध्ये तो सानिया मिर्झाच्या साथीने उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर कास्यपदकाच्या लढतीतही या जोडीचा पराभव झाला.

पेसभूपती वादामुळे पदकापासून वंचित

लिएंडर पेस व महेश भूपती ही हिंदुस्थानची ‘इंडियन एक्स्प्रेस’ म्हणून टेनिस विश्वात प्रसिद्ध झालेली जोडी केवळ आपसातील वादामुळे ऑलिम्पिक पदकापासून वंचित राहिली. लिएंडर पेसने 1996च्या ऑलिम्पिकमध्ये एकेरीत कास्यपदक जिंकले होते, मात्र 2004 मध्ये तो भूपतीच्या साथीत पुरुष दुहेरीत चौथ्या स्थानी राहिले. 2008 मध्ये या हिंदुस्थानी जोडीला फेडरर-वावरिंका जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत हरविले होते. 2012 मध्येही पेस-भूपती ऑलिम्पिक पदकाचे दावेदार होते, मात्र आपसातील मतभेद टोकाला गेल्याने त्यांनी जोडी बनविली नाही.