Paris Olympics 2024 – मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने रचला इतिहास

रातोरात स्टार झालेली नेमबाज मनू भाकर हिने हिंदुस्थानला मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. तिने सरबज्योत सिंगच्या साथीत 10 मीटर एअर पिस्टलच्या मिश्र प्रकारात हिंदुस्थानला कास्यपदक जिंकून देत इतिहास रचला. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही हिंदुस्थानची पहिलीच खेळाडू ठरली, हे विशेष.

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या हिंदुस्थानी जोडीने दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा 16-10 अशा फरकाने पराभव करीत कास्यपदकावर नाव कोरले. कास्यपदकाच्या या लढतीत हिंदुस्थानी जोडीने पहिला सेट गमावला होता, मात्र दुसऱया सेटपासून या जोडीने सातत्याने आघाडी मिळविली. पाचवा सेट कोरियाने जिंकला, मात्र इतर सर्व सेटवर मनू-सरबज्योत या जोडीचेच वर्चस्व बघायला मिळाले. सबरज्योत तीन वेळा मागे पडला होता, मात्र मनूने अचूक निशाणा साधत कास्यपदक हातातून निसटणार नाही, याची खबरदारी घेतली.

हिंदुस्थानच्या नॉर्मन प्रिचर्डनेही जिंकली होती दोन पदके
मनू भाकर हिच्या आधी 1900 साली हिंदुस्थानच्या नॉर्मन प्रिचर्डने पॅरिस ऑलिम्पिकमध्येच दोन पदके जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्याने 200 मीटर शर्यत व 200 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदके जिंकली होती. ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे ते पहिलेच पदक होते, मात्र हे पदक तसे वादातीत आहे. अँग्लो इंडियन वडील व ब्रिटिश आईच्या पोटी जन्मलेला पिचर्डची जन्मभूमी कोलकाता होती, मात्र त्यावेळी हिंदुस्थानवर राज्य करणाऱया इंग्लंडने प्रिचर्डच्या पदकावर दावा केलेला आहे. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकलेला प्रिचर्ड मायदेशात म्हणजे हिंदुस्थान आला होता, मात्र हिंदुस्थानमध्ये ब्रिटनविरुद्धचा स्वातंत्र्यलढा पेटल्याने तो अमेरिकेला निघून गेला. मात्र तो त्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्याच नावावर सहभागी झाला होता. त्यामुळे मनू भाकर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र हिंदुस्थानची पहिली खेळाडू होय, असे म्हणावे लागेल.

नेमबाजीत 12 वर्षांनंतर दोन पदके
हिंदुस्थानने लंडन ऑलिम्पिकनंतर (2012) प्रथमच नेमबाजीत दोन पदके जिंकण्याची कामगिरी केली. तब्बल 12 वर्षांनंतर हिंदुस्थानला एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्यात यश मिळाले.

मनू-सरबज्योत या जोडीने पात्रता फेरीत 580 गुण मिळवीत कास्यपदकाच्या सामन्यातील स्थान पक्के केले होते, मात्र कास्यपदकाच्या लढतीत दक्षिण कोरियाने चांगली सुरुवात केली, तर सरबज्योतने धीमी सुरुवात केली. पहिल्या फेरीत कोरियन संघाला 20.5, तर हिंदुस्थानी संघाला 18.8 गुण मिळाले होते. मात्र त्यानंतर मनू व सरबज्योत जोडीने एकाग्र चित्ताने वेध घेत दुसऱया फेरीत 21.2 गुण मिळविले, तर कोरियाने 19.9 गुण मिळविले होते. तिसऱया फेरीत हिंदुस्थानने पुन्हा बाजी मारली. या फेरीत मनू-सरबज्योत जोडीने 20.8, तर कोरियन संघाने 19.8 गुण मिळविले. पाचव्या फेरीत हिंदुस्थानी जोडी मागे राहिली, मात्र तोपर्यंत हिंदुस्थानी संघाने एपूण गुणांच्या बाबतीत जोरदार मुसंडी मारली होती. पिछाडीवर पडलेल्या कोरियन संघाने सहाव्या फेरीआधी टाइमआऊट घेतला, मात्र त्याचा त्यांना फारसा फायदा झाला नाही. हिंदुस्थानी जोडीने अखेरपर्यंत कोरियन संघावर डोके वर काढण्याची संधी न देता कास्यपदकावर मोहोर उमटविली.