हॉटेल रिकामीच; स्थानिकांना महागाईचा फटका, ऑलिम्पिक आयोजनावर पॅरिसवासीयांची नाराजी

पॅरिस ऑलिम्पिकची तयारी पूर्ण झाली असून हिंदुस्थानसह अवघ्या क्रीडाविश्वातील खेळाडू आता पॅरिसच्या क्रीडागावात दाखल होत आहेत. 26 जुलैपासून सुरू होणाऱया या सर्वोच्च क्रीडा महोत्सवासाठी विशेष तयारी करण्यात आली असली तरी स्थानिक नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. याचबरोबर हे पर्यटनाचे दिवस असतानाही पॅरिसमधील हॉटेल्स रिकामीच आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक ऑलिम्पिकच्या आयोजनावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक नियम असल्याने याचा सर्वाधिक फटका स्थानिकांना बसत आहे. आता येथे प्रत्येक गोष्ट दुप्पट महाग झाली आहे. 2.15 युरोला मिळणाऱया वस्तूसाठी आता 4 युरो मोजावे लागत आहे. पॅरालिम्पिक स्पर्धा संपेपर्यंत म्हणजे 8 सप्टेंबरपर्यंत या महागाईच्या झळा नागरिकांना बसतच राहणार आहेत. ‘ऑलिम्पिकचे आयोजन देशासाठी अभिमानाची बाब असली तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा प्रतिकूल परिणाम नाही व्हायला पाहिजे. महागाई दुप्पट होणे ही नक्कीच चांगली गोष्ट नाहीये.