Paris Olympic 2024 : बॅटमिंटनमध्ये लक्ष्य सेन, पी.व्ही. सिंधू उपांत्यपूर्व, तर नेमबाजीत महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे अंतिम फेरीत

फ्रान्सच्या पॅरिस शहरामध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानचा स्टार बॅटमिंटन खेळाडू लक्ष्य सेन आणि महिला खेळाडू पी.व्ही. सिंधू यांची चमकदार कामगिरी सुरुच आहे. बुधवारी महिला एकेरीत सिंधुने ग्रुप स्टेजमधील सलग दुसरा सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली, तर दुसरीकडे लक्ष्य सेन याने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या खेळाडूवर विजय मिळवत उपात्यपूर्व फेरीमध्ये धडक दिली आहे.

जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असणाऱ्या हिंदुस्थानच्या लक्ष्य सेन याने ‘करो या मरो’ लढतीत इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध दमदार सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये 8-1 असा पिछाडीवर असणाऱ्या लक्ष्यने आपला खेळ उंचावत लागोपाठ 7 पॉइंट घेतले आणि मध्यांतरापर्यंत 11-9 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोघांमध्ये एक-एक पॉइंटसाठी चूरशीचा सामना झाला. एकवेळ 18-18 अशी बरोबरी असताना लक्ष्यने सलग 3 पॉइंट घेतले आणि पहिला गेम 21-18 जिंकला.

त्यानंतर दुसऱ्या गेमची सुरुवातही लक्ष्यने खणखणीत केली. आपल्या भात्यातील एकएक फटके काढत त्याने क्रिस्टीला दमवले. मध्यांतरापर्यंत 11-6 असा आघाडीवर असणाऱ्या लक्ष्यने नंतर मागे वळून पाहिले नाही आणि हा गेम 21-12 असा खिशात घालत सामनाही जिंकला. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

तत्पूर्वी झालेल्या महिला एकेरीच्या लढतीत पी.व्ही. सिंधू हिने आपला शानदार फॉर्म कायम राखत इस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाचा 21-5 आणि 21-10 असा फडशा पाडला. अवघ्या 34 मिनिटांमध्ये तिने सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

महाराष्ट्राचा कुसळे अंतिम फेरीत

दुसरीकडे महाराष्ट्राचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पात्रता फेरीमध्ये त्याने 590 पॉइंट मिळवले आणि सातवे स्थान पटकावले. गुरुवारी दुपारी एक वाजता फायनल रंगणार आहे.